Cancer In Children : लहान मुलांवर होत असतो कॅन्सरचा भावनिक आणि मानसिक प्रभाव
Cancer In Children : लहान वयात कॅन्सर होणे म्हणजे जणू भूकंपच! कॅन्सरचा मानसिक प्रभाव बालकाच्या जीवनाच्या शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक अशा विविध अंगाने पसरत जातो.
Cancer In Children : लहान वयात कॅन्सर (Cancer) होणे म्हणजे जणू भूकंपच! तो इतक्या तीव्रतेने येतो की, त्या लहानग्याचे संपूर्ण विश्वच हादरुन जाते. त्याच्यासोबत निराशा, मानसिक गोंधळ, दीर्घ किचकट उपचार येतात, जे लहान मुलाचे दैनंदिन सामान्य जीवनच हिरावून घेतात. कॅन्सरचा मानसिक प्रभाव बालकाच्या जीवनाच्या शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक अशा विविध अंगाने पसरत जातो. यातील प्रत्येक क्षेत्र एक-दुसर्याशी संलग्न असल्याने एकदुसर्याला प्रभावित करते. शिवाय प्रत्येक क्षेत्रात भावनिक-सामाजिक प्रभावाचे उपसंच देखील असतात. या उपसंचांमध्ये त्या रोगाची कारण आणि तीव्रता, मानसिक-सामाजिक निराशेची पातळी किंवा रोगाच्या अस्तित्वाचा अर्थ आणि रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येणारे उपचार यांचा समावेश असतो. कॅन्सरच्या उपचारांमार्फत पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजिस्ट त्या रुग्णाच्या नैदानिक स्थितीनुसार काही क्षेत्रांवर भर देतो किंवा ती दूर करतो.
एकाकी करणारा आजारपणाचा अनुभव
सगळ्यात जास्त प्रभावित होणारा आणि महत्त्वाचा, प्राथमिक चिंतेचा विषय म्हणजे शारीरिक पैलू. याचे कारण म्हणजे हा रोग किती तीव्र आहे, यावरुन रुग्णाच्या अवयवांची कार्यक्षमता ठरते. शारीरिक प्रभावाच्या पाठोपाठ सामाजिक आणि मानसिक प्रभाव येतात. निदानानंतर बदललेली दिनचर्या, उपचार, एकटेपणाचे प्रसंग, हॉस्पिटलमध्ये कमी-जास्त काळ राहावे लागणे, शाळेत जाता न येणे, मित्रांशी खेळायला वेळ न मिळणे वगैरे गोष्टींमुळे हा रोग झालेल्या मुलाला असह्य त्रास होतो. केस गळणे, त्वचा फिकट होणे, उंची आणि वजन प्रभावित होणे, एकंदरित ऊर्जा पातळी कमी होणे, यामुळेही त्यांच्यावर सामाजिक आणि भावनिक परिणाम होतो आणि हा आजारपणाचा अनुभव खूप एकाकी करणारा असू शकतो. शरीरावर होणारा परिणाम हळूहळू मूड बदलणे, चिंता, निराशा, चिडचिड, राग, संताप किंवा संपूर्ण हार मानणे यामध्ये रुपांतरित होत जातो. आपल्या मुलामध्ये होणारे हे भावनिक आणि मानसिक बदल हाताळणे माता-पित्यासाठी अत्यंत जिकीरीचे असते. आपल्या मुलाला शारीरिक आणि भावनिक त्रास सोसताना बघणे हे पालकांसाठी फारच क्लेशदायक असते.
सामान्य दिनचर्येत परतणे कठीण
हा रोग वाढत जातो, तसे मुलाची भूक, झोप आणि त्याची हालचाल करण्याची ताकद कमी-कमी होत जाते. कधीकधी उपचार केल्यानंतर मुलामध्ये सायकोसोमॅटिक वेदना आणि क्रॉनिक पेइन सिंड्रोम विकसित होतो. अभ्यासापासून बराच काळ लांब राहिल्याने सुद्धा त्याच्या सामाजिक आणि संज्ञानात्मक वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि कधी कधी ही मुले शिक्षणात मागे पडतात. काही मुलांना अॅडजस्ट करताना अडचणी येतात आणि उपचार घेतल्यानंतर आपल्या सामान्य दिनचर्येत परतणे त्यांना कठीण जाते.
मुलांना प्रश्न विचारण्याची मुभा द्या; कॅन्सर, उपचारांविषयी स्पष्ट शब्दात उत्तर द्या
मानसशास्त्रज्ञ आणि कला आधारित थेरपी प्रॅक्टिशनर-एनएचएसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल च्या डॉ.सच्ची पंड्या सांगतात की, मुलांची कल्पनाशक्ती दांडगी असते आणि बर्याचदा ती आपल्या आजाराविषयी आणि उपचारांविषयी आपल्या मनात एक कहाणी रचतात. बर्याचदा उपचार सोसतात याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. मात्र उपचारांशी जुळवून घेताना आणि सहकार देताना त्यांना त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ, एका 10 वर्षाच्या मुला/मुलीने जर हे ऐकले की, त्याच्यावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट (BMT) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, तर तो असा विचार करेल की ही एक मोठी शस्त्रक्रिया असावी आणि ती करताना आपल्याला एकट्याला बराच काळ एका खोलीत राहावे लागणार आहे. अशी कल्पना केल्यामुळे ते मूल हतबल होऊन जाईल आणि उपचारला कदाचित चांगला प्रतिसाद देणार नाही. त्यामुळे, आपल्या मुलाला रोगाविषयी/उपचारांविषयी किती समज आहे याची माहिती पालकांना/थेरपिस्टला/ऑन्कॉलॉजिस्टला असणे गरजेचे आहे. मुलांना प्रश्न विचारण्याची मुभा द्या आणि त्यांना कॅन्सरविषयी, उपचारांविषयी स्पष्ट शब्दात आणि त्यांना समजेल असे उत्तर द्या. वर दिलेल्या उदाहरणात मुलाला BMT विषयी समजावताना बागकामाची उपमा देऊन केमो नामक खास औषधाच्या मदतीने शरीरातून खराब झालेल्या पेशी मातीतून तण काढून नवे रोप लावतो, त्याप्रमाणे नव्या निरोगी पेशी शरीरात रोपण्याची प्रक्रिया मुलाला समजावून देता येईल. निरोगी आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यात रुजवत असतानाच BMT मुळे काय-काय होऊ शकते, काय सामान्य दुष्परिणाम होऊ शकतात, आणि त्याचा सामना करण्यासाठी काय करावे लागेल, हे त्यांना सांगितले पाहिजे. जेणेकरुन ते उपचार सकारात्मकतेने स्वीकारतील आणि त्यांच्यासाठी आणि पालकांसाठी ही संपूर्ण प्रक्रिया थोडी सुकर होईल. चित्रे, गोष्टी यांचा उपयोग करा, मुलांशी खेळण्याचे नाटक करा, किशोरावस्थेतील आणि शालेय मुलांसाठी माहितीपूर्ण टेम्प्लेट्सचा उपयोग करा, त्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्या, त्यांच्या आरोग्य देखभालीत सामील होऊ द्या असे केल्याने उपचारादरम्यान त्यांचा चांगला सहकार मिळू शकेल.
सकारात्मक दृष्टिकोन विकसित केल्यास मोठी मदत
आपल्या आजाराबाबत आणि उपचारांबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यात मुलाला मदत केल्याने, त्याला उभारी, लवचिकता आणि सुरक्षेची भावना दिल्याने त्याच्या जीवनाच्या लढ्यात आणि भविष्याशी जुळवून घेण्यात त्याला मोठी मदत होऊ शकते. असे केल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान दृढ राहतो. त्यामुळे संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान मुलांना सकारात्मक आणि पोषक वातावरण मिळणे, शक्य तितकी सामान्य वागणूक मिळणे, शिकण्यात आणि खेळण्यात त्यांनी स्वतःला गुंतवणे आवश्यक आहे. लहान मुलांना उपचार देताना त्यांना कला आणि क्रीडा यांच्या आधाराने त्यांना झालेल्या रोगाचे निदान आणि उपचार याबाबत वयानुरुप समज देणे हाच मुलांच्या हॉस्पिटलचा किंवा एखाद्या पेडियाट्रिक युनिटचा उद्देश असतो. ते हॉस्पिटलच्या सेटअपमध्ये मुलांना विकासासाठी पोषक वातावरण आणि संधी देतात आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे जीवन शक्य तितके सामान्य राहून जगण्यासाठी आधार देऊ करतात.
मुले स्वतः आशेचे आणि उज्ज्वल भविष्याचे मूर्तीमंत रुप असतात. त्यामुळे, कॅन्सर पीडित प्रत्येक मुलाला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेसह उत्तम देखभाल मिळण्याची संधी मिळालीच पाहिजे.
- डॉ.सच्ची पंड्या, मानसशास्त्रज्ञ आणि कला आधारित थेरपी प्रॅक्टिशनर-एनएचएसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )