नाकात बोटं घालताय? 'हा' गंभीर आजार बळावू शकतो, संशोधनातून धक्कादायक खुलासा
Alzheimer's Disease and Dementia Symptoms : काही लोक नकळत नाकात बोटं घालत राहतात. पण ही किळसवाणी सवय गंभीर मानसिक आजाराला कारणीभूत ठरू शकते. जाणून घ्या सविस्तर...
Alzheimer's Disease and Dementia Symptoms : लहानपणी आई ओरडायची की, नाकात बोटं घालू नकोस... त्यावेळी आईच्या सांगण्याची कटकट वाटायची, पण त्यावेळी माहीत नव्हतं की, नाकात बोटं घालणं फक्त किळसवाणंच नाहीतर, जीवघेणंही ठरू शकतं. हो... तुम्हालाही नाकात बोटं घालण्याची सवय असेल, तर या सवयीमुळे तुम्हाला गंभीर आजार बळावू शकतो.
नाकात बोटं घालणं ही अशी सवय आहे, जी किळसवाणी वाटते. या कृतीमुळे पाहणाऱ्यांनाही त्रास होतो. काही लोक नाकात बोट घालण्याबरोबरच नाकाचे केसही उपटतात. तुम्हीही असं करत असाल, तर वेळीच सावध व्हा. अन्यथा गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. एका संशोधनातून यासंदर्भातील धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, नाकात बोटं घातल्यानं किंवा नाकातील केस उपटल्यानं मेंदूचे गंभीर आजार बळावू शकतात. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, अल्झायमर (Alzheimer) किंवा स्मृतिभ्रंश (Dementia) होऊ शकतो.
काय सांगितलंय संशोधनात?
सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, नाकात बोटं घातल्यानं अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. कारण, आपल्या नाकात असलेली ओलफेक्ट्री नर्व (Olfactory Nerve) थेट मेंदूशी जोडलेली असते आणि या मार्गानं व्हायरस (Virus) आणि बॅक्टेरिया (Bacteria) थेट मेंदूच्या पेशींपर्यंत पोहोचतात.
नाकात बोटं घातल्यानं अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश, संशोधनातून सिद्ध
TOI नं दिलेल्या वृत्तानुसार, क्लेम सेंटर फॉर न्यूरोबायोलॉजी आणि स्टेम सेल रिसर्च सेंटरचे संशोधन प्रमुख प्रोफेसर जेम्स सेंट जॉन यांनी सांगितलं की, हे संशोधन उंदरांवर करण्यात आलं होतं. संशोधनाअंती असं दिसून आलं की, अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्यास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नाकाच्या नसेद्वारे उंदरांच्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि नंतर अल्झायमरसारख्या आजाराची (Alzheimer's Disease Symptoms) लक्षणं त्यांच्यामध्ये दिसू लागतात.
अल्झायमर आणि डिमेंशियासारखे गंभीर आजार कसे बळावतात?
अल्झायमर रोग कसा होतो?
अल्झायमरला (Alzheimer) कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचे नाव क्लॅमिडीया न्यूमोनिया (Chlamydia Pneumoniae) आहे. ज्यामुळे न्यूमोनियाचाही धोका वाढतो. हा जीवाणू नाकाच्या नसेद्वारे मज्जासंस्थेपर्यंत पोहोचतो. त्यामुळे याला प्रतिकार करण्यासाठी मेंदूच्या पेशी अमिलॉएड बीटा प्रोटीन तयार करतात. हेच प्रोटिन अल्झायमर बळावण्याचं कारण ठरतात. अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये हे प्रोटिन आढळून येतं.
डिमेंशिया कसा बळावतो?
डिमेंशिया हा एक गट आहे, ज्यामध्ये विविध रोगांमुळे मेंदूला हानी पोहोचल्यावर दिसणाऱ्या लक्षणांचा समावेश होतो. डिमेंशियामध्येच अल्झायमरची लक्षणं दिसून येतात. MayoClinic च्या मते, अल्झायमर एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये मेंदू हळूहळू संकुचित होऊ लागतो आणि मेंदूच्या पेशी नष्ठ होऊ लागतात. या आजारामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पसचा भाग प्रथम प्रभावित होतो. यामुळे शिकण्याचे आणि लक्षात ठेवण्याचे काम करतो. एका अंदाजानुसार, सुमारे 40 लाख भारतीयांना कोणत्या ना, कोणत्या प्रकारचा स्मृतिभ्रंश होतो.
अल्झायमरची सुरुवातीची लक्षणं
NHS च्या मते, अल्झायमर रोगाचे अनेक टप्पे आहेत. ज्याच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये खालील लक्षणं दिसू लागतात.
- काही दिवसांपूर्वीच्याच गोष्टी किंवा संभाषण विसरणं
- एखादी वस्तू एका ठिकाणी ठेवून विसरणं
- ठिकाणांची किंवा वस्तूंची नावं विसरणं
- सतत एकच गोष्ट विचारणं
- नवीन गोष्टी शिकण्यास टाळाटाळ करणं
अल्झायमरच्या मधल्या टप्प्यातील लक्षणं
- विसरण्याची समस्या वाढणं, जसं की, वेळंही विसरणं
- एखादी गोष्ट वारंवार करणं
- बोलण्यात किंवा समजण्यात अडचणी येणं
- निद्रानाश
- मूड बदल
- पाहणं, ऐकणं आणि वास घेण्यात समस्या
- सतत भास होणं
अल्झायमरची गंभीर लक्षणं
- खाताना किंवा गिळताना त्रास होणं
- कारणाशिवाय वजन कमी होणं
- हळूहळू बोलण्याची क्षमता गमावणं
- लघवी करणं
- अल्प आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती कमी होणं
मानवावर संशोधन करणं गरजेचं, संशोधकांचं मत
संशोधन प्रमुख प्रोफेसर जेम्स सेंट जॉन म्हणाले की, "हे संशोधन सध्या उंदरांवर करण्यात आलं आहे. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, हे केवळ उंदरांसाठीच नाहीतर मानवासाठीही धोकादायक ठरते. दरम्यान, हे बॅक्टेरिया उंदरांप्रमाणेच माणसांच्या मेंदूपर्यंत पोहोचतात का? यासंदर्भात संशोधन करणं गरजेचं आहे. त्यामुळे उंदरांप्रमाणेच हे संशोधन मानवावरही करणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही लवकरच नवीन संशोधन करणार आहोत, जेणेकरून ठोस माहिती मिळू शकेल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )