(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AI Surgery : देशात पहिल्यांदाच रक्ताच्या गुठळ्यांवर AI शस्त्रक्रिया, 62 वर्षीय रुग्णाला जीवदान
AI Removed Blood Clots : एका 62 वर्षीय रुग्णावर गुडगावमधील एका खाजगी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारात फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.
AI Blood Clot Surgery : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर रुग्णालयांमध्येही वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) तंत्रज्ञान वापरून आता शस्त्रक्रिया करण्यातही डॉक्टरांना यश आलं आहे. रक्ताच्या गुठळ्या झालेल्या रुग्णावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence Technology) वापर करून यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. देशात पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पल्मोनरी एम्बोलिझमने ग्रस्त असलेल्या 62 वर्षीय रुग्णावर गुडगावमधील एका खाजगी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाद्वारे (AI Technology) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारात फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.
रक्ताच्या गुठळ्यावर यशस्वी AI शस्त्रक्रिया
हरियाणाच्या गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसात आणि पायाच्या खोल शिरामध्ये रक्ताची गुठळी असलेल्या 62 वर्षीय रुग्णावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, यामुळे मेदांता हे अशा प्रकारचे तंत्रज्ञान स्वीकारणारे देशातील पहिले रुग्णालय ठरलं आहे. फुफ्फुसातील रक्ताची गुठळी काढण्यासाठी देशात पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नरेश त्रेहान यांनी केला आहे.
पल्मोनरी एम्बोलिझमने त्रस्त रुग्णावर एआय शस्त्रक्रिया
अलिकडच्या काळात देशात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं आहे. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होणं, हे याचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे रक्ताचा प्रवाह नीट होत नाही आणि ह्रदयविकाराचा झटका येतो. डॉ.नरेश त्रेहान यांनी सांगितलं की, मेदांता रुग्णालयामध्ये इतर आजारांच्या उपचारांसाठी गेल्या वर्षी जुलैमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला होता. आतापर्यंत 25 रुग्णांवर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत कमीतकमी रक्तस्त्राव होतो आणि रुग्ण लवकर बरे होताता, असं त्यांनी सांगितलं. भविष्यात एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पल्मोनरी एम्बोलिझमने त्रस्त असलेल्या रुग्णांवर अधिक चांगले उपचार करणे शक्य होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे
एआय तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रियेत धोक्याची शक्यता कमी
पल्मोनरी एम्बोलिझम रोगामध्ये, फुफ्फुसाच्या धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन त्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. डॉ नरेश त्रेहान यानी सांगितलं की, एआय तंत्रज्ञानाद्वारे छाती आणि धमन्या न उघडता रक्ताची गुठळी सहज काढता येते. या प्रक्रियेला 15 मिनिटे लागतात. यापूर्वी यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागत होते आणि त्यामध्ये धोक्याची शक्यता खूप जास्त होती. पण, या शस्त्रक्रियेत तुलनेने धोक्याची शक्यता कमी असते, असं डॉक्टरांनी सांगितलं.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला डिस्चार्ज
पायलट असलेल्या नरेंद्र सिंग यांना श्वासोच्छवासाचा त्रास, अचानक पाय दुखणे आणि सूज यांमुळे आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉ तरुण ग्रोव्हर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''पेनंब्रा फ्लॅश 12 एफ कॅथेटर वापरून रक्ताच्या गुठळ्या काढण्यात आल्या. एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन गुंतागुंतीच्या नसांना नेव्हिगेट केले आणि रक्ताच्या गुठळ्या काढण्यात आल्या. यामुळे रुग्णाला त्वरित आराम मिळाला. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील उपचारांसाठी रुग्णाला 48 दिवसांनंतर तपासणीसाठी बोलवण्यात आलं आहे.''
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )