Health Tips : बैठ्या जीवनशैलीचा तुमच्या हृदयावर कशा प्रकारे होतो दुष्परिणाम? वाचा तज्ज्ञांचं मत
Health Tips : बैठ्या जीवनशैलीचा तुमच्या हृदयावर कशा प्रकारे दुष्परिणाम होतो. या संदर्भात मुंबईतील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे यांनी माहिती दिली आहे.

Health Tips : विसाव्या शतकात धूम्रपान हा सार्वजनिक आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला होता. आजच्या काळात मात्र बैठी जीवनशैली हे दीर्घकालीन आजाराचे आणि अकाली मृत्यूचे एक प्रमुख कारण झाले आहे. याच संदर्भात मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
साथीचा मूक आजार
अलीकडेच दहा लाखांहून अधिक लोकांचा या संदर्भात एक अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, दिवसभरात आठ तासांपेक्षा अधिक वेळ बसून राहणे आणि त्याची भरपाई करणारी कोणतीही शारीरिक हालचाल न करणे यामुळे निर्माण होणारा धोका हा लठ्ठपणा आणि धूम्रपानाइतकाच जीवघेणा असतो. खरे तर, जे लोक सतत एका जागी बसून राहतात, त्यांना नियमित हालचाल करणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकार आणि कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या जास्त असतो.
जागतिक पातळीवरील समस्या
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या जगभरातील सुमारे 1.8 अब्ज प्रौढांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना हृदयविकार, स्ट्रोक, टाइप 2चा मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका अधिक आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. ऑफिसवर बसून करावी लागणारी नोकरी आणि डिजिटल करमणुकीच्या सवयींमुळे ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. अमेरिकेत दर चारपैकी एक व्यक्ती दररोज आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसून घालवते. आरोग्यशास्त्राचा विचार करता हे प्रमाण सामान्य प्रमाणाच्या खूप जास्त आहे.
बैठ्या जीवनशैलीमुळे काय होते?
जेव्हा तुम्ही सतत बसून राहता, तेव्हा शरीरातील मोठे स्नायू जणू काही काम करायचं थांबवतात. यामुळे अवघ्या अर्ध्या तासात शरीराची चयापचय क्रिया सुमारे 90% पर्यंत मंदावते. स्नायूंच्या हालचाली कमी झाल्यामुळे शरीरात साखरेचे नियंत्रण बिघडते, रक्तातील साखर वाढते आणि कोलेस्ट्रॉलसारख्या चरबीसंबंधी घटकांचा समतोल बिघडतो. ही सगळी लक्षणे म्हणजे 'मेटाबॉलिक सिंड्रोम'ची सुरुवात असते. यात धमन्यांमध्ये प्लाक साचण्याची प्रक्रिया अधिक वेगाने घडून येते.
रक्तप्रवाहात अडथळा
दीर्घकाळ हालचाल न केल्यामुळे रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे फॅटी अॅसिड्स आणि लिपिड्स हे घटक रक्तवाहिन्यांच्या आंतरपटलांवर साचू लागतात. कालांतराने यामुळे अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच धमन्यांमध्ये चरबीचे थर तयार होऊ लागतात. परिणामी कोरोनरी आर्टरीज अरुंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. विविध लोकसमूहांवर केलेल्या एका मोठ्या अभ्यासात दिसून आले आहे की, सतत एका जागी बसून राहण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका सुमारे 34% ने वाढतो.
दररोज व्यायाम केलात तरच उपयोग; अन्यथा बैठ्या जीवनशैलीचा धोका कायम
एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की, जर दररोज 60 ते 75 मिनिटे मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम केला, तर सतत बैठ्या जीवनशैलीचे घातक परिणाम बऱ्याच अंशी टाळता येतात. पण वास्तव हे आहे की, बहुतेक प्रौढ या पातळीपर्यंत पोहोचतच नाहीत. 2024 मध्ये तैवानमध्ये 4.8 लाख व्यक्तींवर केलेल्या एका दीर्घकालीन अभ्यासात दिसून आले की, दिवसभर बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका दिवसभर शारीरिक हालचाल करणाऱ्यांच्या तुलनेने 34% अधिक होता. थोडा वेळ केलेला व्यायाम उपयोगी ठरतो, पण जर उरलेला संपूर्ण दिवस बसूनच गेला, तर ते नुकसान पूर्ण भरून निघत नाही.
बसून राहण्याची सवय मोडून काढा.
छोट्या हालचाली, मोठे फायदे
दर 20-30 मिनिटांनी उभे राहा : सतत बसून राहणे थांबवण्यासाठी गजर लावा. अवघी दोन मिनिटे चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्यामुळेही रक्ताभिसरण सुधारते आणि साखरेचे नियंत्रण चांगले राहते.
वॉकिंग मिटिंग्स : मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूमऐवजी ऑफिस किंवा कॅम्पसभोवती फेरफटका मारा.
ॲक्टिव्ह प्रवास : गाडी थोडी दूर पार्क करा, सार्वजनिक परिवहनाचा वापर करत असाल तर एक स्टॉप आधी उतरा किंवा शक्य असेल तेव्हा सायकलने जा.
सीट–स्टँड वर्कस्टेशन्स : बसून काम करण्यासोबतच, उभे राहून काम करण्याचाही पर्याय ठेवा. मात्र लक्षात ठेवा, हालचाल न करता फक्त उभे राहणे पुरेसे नाही.
कामाच्या ठिकाणी संस्कृतीत बदल आवश्यक.
नियोक्त्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा
- एकत्रितपणे “हालचाली साठी ब्रेक' घेण्याची सवय लावून घ्या.
- पायऱ्या मोजण्याच्या स्पर्धांसाठी प्रोत्साहन द्या.
- कार्यालयांची रचना अशी ठेवा की चालण्याला चालना मिळेल (उदाहरणार्थ – मध्यवर्ती ठिकाणी प्रिंटर लावणे, उभे राहून चर्चा करता येईल, अशा जागा तयार करणे).
प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आवाहन
जसे धूम्रपानावर बंदी आणि जनजागृती मोहिमांमुळे समाजातील तंबाखूविषयक दृष्टीकोन बदलला, तसे आता 'बसून राहण्याच्या साथी'ला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक आरोग्य उपक्रम, चालण्यास प्रोत्साहन देणारी शहर रचना आणि हालचालीला प्रोत्साहन देणारी कामाच्या ठिकाणांमधील धोरणे हे बदल होणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर, दिवसातील प्रत्येक तासाला थोडी हालचाल समाविष्ट केली, तर त्या हालचालीमुळे तुमचे हृदय कोणतेही इतर औषध न घेता अधिक सुरक्षित राहू शकते.
बसणे ही आता अघातक सवय राहिलेली नाही. ही सवय आरोग्याची गंभीर शत्रू झाली आहे. उभे राहा, सतत हालचाल करा आणि तुमचे हृदय सुदृढ करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Eye Care : साठीनंतर 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी; नियमित करा मोतीबिंदू तपासणी, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























