(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fitness Mantra : 'हे' एरोबिक व्यायाम महिलांचे वजन कमी करण्यासाठी ठरतील बेस्ट; निरोगी आरोग्याबरोबरच तणावही होईल कमी
Aerobic Exercise : आजकाल महिलांमध्ये फिटनेसची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.
Aerobic Exercise : आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते प्रदूषण, आरोग्याच्या समस्या, बदलती जीवनशैली यामुळे अनेक लोक फिटनेसबाबत फार सतर्क झाले आहेत. पुरुषांप्रमाणेच महिलाही आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी योगा क्लास, जिमला जाणाऱ्या महिला आणि मुलींच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. अशामध्येच फिटनेस फ्रिक महिलांसाठी आम्ही काही अतिशय फायदेशीर एरोबिक व्यायामाची माहिती घेऊन आलो आहोत.
जर तुम्ही तुमच्या वाढत्या वजनाने हैराण असाल तर या सोप्या एरोबिक व्यायामाद्वारे तुम्ही सहज वजन कमी करू शकता. असे केल्याने तुमचा ताणही दूर होईल. त्यांचे इतर अनेक फायदेही तुम्हाला जाणवू लागतील.
महिलांसाठी आवश्यक व्यायाम :
सायकलिंग : सायकलिंग हा महिलांसाठी सर्वोत्तम व्यायामांपैकी एक आहे. दररोज सायकलिंग केल्याने मांड्या आणि गुडघे ताणले जातात. तसेच, सायकलिंग केल्याने फिगरदेखील चांगली होते.
जॉगिंग : जॉगिंगमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. सर्वात महत्वाचं म्हणजे जॉगिगं केल्याने तुमचा स्टॅमिना वाढतो. या व्यायामामुळे तुम्ही फिट आणि परफेक्ट फिगर मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. रोज असे केल्याने तुमचे शरीरही चपळ राहते. सकाळी जॉगिंग केल्यानेही मन फ्रेश आणि ताजेतवाने राहते.
दोरी उड्या मारणे : दोरीवर उड्या मारणे हा प्रत्येकासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. परंतु, महिलांसाठी तो खूप फायदेशीर आहे. याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. नव्यानेच स्किपिंग करणाऱ्या महिलांसाठी - सुरुवातीला तुमच्या क्षमतेनुसार स्किपिंग करा आणि हळूहळू संख्या वाढवा. तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.
जिन्यावरून चढ-उतार करणे : असे नेहमी म्हटले जाते की, जिन्यांची चढ-उतार करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत लिफ्टऐवजी जास्तीत जास्त पायऱ्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
नृत्याची आवड जपा : नृत्य हा केवळ तुमच्या मनोरंजनाचा भाग नाही. हा देखील तुमच्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. दररोज किमान एक तास नृत्याचा सराव करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.
स्विमिंग करा : प्रत्येक महिलेला पोहता आले पाहिजे. याचे अनेक फायदे तर आहेतच. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे तुम्ही तुमचे संरक्षण करू शकता. तसेच, यामुळे तुमचे शरीरयष्टी सुधारते.
जम्पिंग जॅक : जम्पिंग जॅक हा व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण गतिमान होते. त्यामुळे चरबी बर्न होते. दररोज असे केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.