Blackheads Removing Tips : चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स काढण्याचे 5 घरगुती उपाय; त्वचा होईल मऊ आणि सुंदर!
Skin Care Tips: बहुतेक वेळा ब्लॅकहेड्स हे नाकाजवळ येतात, ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि त्यांना काढणं खूप कठीण जातं. काही घरगुती उपायांद्वारे तुम्ही ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतात.
Home Remedies: चेहऱ्यावर ब्लॅहेड्स (Blackheads) येणं हे फार कॉमन आहे. वातावरणातील प्रदूषण, धूळ हे आपल्या त्वचेवर बसतात आणि त्वचेवरील छिद्रात (Skin Pores) ही घाण साचून त्या जागी ब्लॅकहेड्स तयार होतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स जास्त असतात, कारण त्वचेवरील तेलामुळे घाण त्वचेवरच चिकटून राहते. त्वचेवर साचलेल्या धुळीमुळे लहान दाणे तयार होतात आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन त्वचा काळी पडते, यालाच ब्लॅकहेड्स म्हणतात. हे ब्लॅकहेड्स बहुतेक वेळा नाकाजवळ येतात, जे काढणं फार कठीण असतं, कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज निघायचं नाव घेत नाहीत. बऱ्याचदा तुमची त्वचा स्वच्छ असते, पण तुमचं नाक हे ब्लॅकहेड्सने भरलेलं असतं. तर, काही घरगुती उपाय करून तुम्ही ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतात.
अंड्याचा वापर
अंड्याचा पांढरा भाग (White Egg Bulk) हा ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरतो.अंड्याचा पांढरा भाग त्वचेवरील छिद्र आकसण्यातही मदत करतो, या फेस मास्कच्या नियमित वापरामुळे त्वचा देखील उजळ होते. एका वाटीत अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिक्स करा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावा आणि 15 ते 20 मिनिटं ते नीट सुकू द्या, शेवटी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
बेकिंग सोडा
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर देखील खूप फायदेशीर मानला जातो. बेकिंग सोडा (Baking Soda) एक्सफोलिएटर म्हणून काम करतो आणि चेहऱ्यावरील तेल देखील शोषून घेतो. हा उपाय करण्यासाठी एका वाटीत दोन चमचे पाणी घ्या आणि त्यात तीन छोटे चमचे बेकिंग सोडा मिक्स करा आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल.
ग्रीन टी
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी ग्रीन टी (Green Tea) देखील उपयुक्त ठरते. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी एक चमचा ग्रीन टी पाण्यात मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
तांदळाचे पीठ
तांदळाचे पीठ (Rice Flour) उत्तम स्क्रबर म्हणून काम करते. त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यात तांदळाचे पीठ फायदेशीर ठरते. या पिठामुळे त्वचा नैसर्गिक स्वरुपात उजळते. कोरफड जेलमध्ये तांदळाचे पीठ मिक्स करून लावल्यास चेहरा उजळतो, ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. आठवड्यातून तीन वेळा या फेस स्क्रबचा वापर केल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या दूर होईल.
मध
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मधाचा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो. या उपायासाठी मध (Honey) हलके गरम करा आणि जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथे लावा. साधारण 10 ते 15 मिनिटं मध चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. चेहरा धुताना मध हलक्या हातांनी चोळून काढा. आठवडाभर असे केल्याने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.
लिंबाचा रस
ब्लॅकहेड्स असलेल्या त्वचेच्या ठिकाणी दिवसातून तीन वेळा लिंबाचा रस (Lemon Juice) लावा, यामुळे ब्लॅकहेड्स दूर होतात. बेसन पिठात लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट देखील चेहऱ्यावर लावू शकता, त्यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.
हळद
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध हळद (Turmeric) ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हळदीमुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता होते. हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा.
हेही वाचा:
Skin Care: चेहऱ्याची प्रत्येक समस्या आठवडाभरात होईल दूर, रोज करा फक्त हे 2 उपाय