Earth Day 2020 : पृथ्वी दिवस म्हणजेच अर्थ डे बद्दल सर्व काही
यंदा पृथ्वी दिवसला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. पृथ्वी आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अर्थ डे साजरा करण्यात येतो.
मुंबई : पर्यावरणाचा रक्षणासाठी जगभरात दरवर्षी पृथ्वी दिवस अर्थात अर्थ डे साजरा केला जातो. यासाठी 22 एप्रिल हा दिवस ठरवण्यात आला आहे. पृथ्वी आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अर्थ डे साजरा करण्यात येतो.
याची सुरुवात कशी झाली? 1970 सालापासून अर्थ डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यानंतर जगभरातील जवळपास 195 देश अर्थ डे साजरा करतात. हे जगातील सर्वात मोठं जनजागृती आंदोलन आहे, ज्यात एकाच वेळी 195 देशांमधील अब्जावधी नागरिक सहभागी होतात आणि पृथ्वीच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेतात.
पृथ्वी दिवसचे 50 वर्षे याआधी पृथ्वी दिवस दोन वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असे. 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जात होता, संयुक्त राष्ट्राचीही याला परवानगी होती. तर 22 एप्रिलला पृथ्वी दिवस साजरा केला जात असे. पण 22 एप्रिल 1970 पासून जगभरातील 195 देश या दिवशीच पृथ्वी दिवस साजरा करतात. यंदा पृथ्वी दिवसला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.
रंजक इतिहास 22 जानेवारी 1969 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सँटा बार्बरामध्ये तीन मिलियन गॅलन तेल समुद्रात सांडलं. यामुळे 10 हजारांपेक्षा जास्त समुद्र पक्षी, डॉल्फिन, सील आणि सी लायन्सचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अमेरिकेचे सीनेटर गेलॉर्ड नेल्सन अतिशय दु:खी झाले. त्यांनी पर्यावरणासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. त्यानंतर 22 एप्रिल 1970 रोजी जवळपास दोन कोटी अमेरिकन नागरिक पृथ्वी दिवसात सहभागी झाले. गेलॉर्ड नेल्सन यांना फादर ऑफ अर्थ डे म्हणूनही संबोधलं जातं.
तारखेमागचं लॉजिक सीनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी 22 एप्रिल हीच तारीख का निवडली? यामागेही एक लॉजिक आहे. त्यांनी अशी तारीख निवडली, ज्या दिवशी जास्तीत जास्त सहभागी होऊ शकतात. त्यांना यासाठी 19 ते 25 एप्रिलपर्यंतचा आठवडा योग्य वाटला.
'अर्थ डे' शब्द कसा तयार झाला? लोकांमध्ये 'अर्थ डे' हा शब्द रुळवण्याचं काम सर्वात आधी अमेरिकेतील कॉपीरायटर ज्युलियन कोनिग यांनी केलं. 1969 मध्ये त्यांनी जगाला या शब्दाची ओळख करुन दिली. बर्थ डे या शब्दावरुन अर्थ डे तयार झाला. बर्थ डे आणि अर्थ डे या शब्दांचं यमक जुळत असल्याचं कोनिग यांनी सांगितलं. योगायोग म्हणजे ज्युलियन कोनिग यांची जन्मतारीखही 22 एप्रिल आहे.
दरवर्षी नवी थीम प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी विशेष थीम असते. यंदा अर्थ डे 2020 साठी 'क्लायमेट अॅक्शन' ही थीम आहे. क्लायमेट चेंज हा अनेक दशकांपासून जगासमोरील मोठा प्रश्न बनला आहे. मनुष्यजातीच्या भविष्यासाठी, पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी वातावरण बदलाबाबत सकारात्मक सुधारणांची आवश्यकता आहे. मागील वर्षी 'प्रोटेक्ट अवर स्पेशिज' ही थीम होती.
2020 चा अर्थ डे वेगळा! 2020 चा अर्थ डे हा सर्वार्थाने वेगळा ठरणारा आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. जनावरांनी मोकळा श्वास घेतला आहे. पक्षांचा किलबिलाट ऐकू येत आहे. प्रदूषणाचा स्तर कमी झाला आहे. जणू काही स्वत:ला वाचवण्याची जबाबदारी पृथ्वीनेच घेतली असावी. त्यामुळे अर्थ डेच्या निमित्ताने पृथ्वीचं हे सौंदर्य कायम राखण्यासाठीच नाही तर ती आणखी सुंदर कशी होईल याचा निश्चय करुया.