Early Dinner Benefits : रात्री सातच्या आत करा जेवण! लवकर जेवण करण्याचे 'हे' आहेत फायदे
Early Dinner Benefits : आपल्या जीवनशैलीचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होऊ शकतात ज्यामुळे अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते.
Early Dinner Benefits : अलीकडेच, Frontiers in Nutrition या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, रात्रीचे जेवण लवकर केल्याने तुमचे आयुष्य वाढू शकते. या अभ्यासात, इटलीतील एका गावातील लोकांवर संशोधन करण्यात आले आणि असे आढळून आले की, त्या ठिकाणचे सर्व लोक जे 90 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, ते संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रात्रीचे जेवण करतात. तसेच, ते कमी कॅलरी अन्न खातात. त्यामुळे या लोकांचा आहार वनस्पतींवर आधारित असल्याचेही आढळून आले. त्यांच्या आहारात तृणधान्ये, फळे, भाज्या आणि कडधान्यांचा अधिक समावेश असतो. येथील लोकांची जीवनशैलीही अतिशय सक्रिय आहे. हे स्पष्टपणे समजू शकते की जीवनशैलीचा आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर मोठा प्रभाव पडतो. चला तर जाणून घेऊयात लवकर रात्रीचे जेवण करण्याचे नेमके कोणते फायदे आहेत.
पचनासाठी फायदेशीर
आपल्या पचनक्रियेसाठी रात्रीचे जेवण लवकर करणे खूप फायदेशीर आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास जेवण केल्याने झोपण्यापूर्वी पुरेसा वेळ मिळतो, त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. रात्रीचे जेवण उशिरा केल्याने आम्लपित्त, गॅस, ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. कारण आपल्या शरीराची कार्ये मंदावतात. त्यामुळे रात्री लवकर जेवण करणे तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते.
चांगली झोप लागते
रात्रीचे जेवण आणि झोपेत जास्त वेळ असल्याने तुम्हाला चांगली झोप लागते. कारण अन्न सहज पचते. अपचनाची समस्या कमी असल्याने चांगली झोप लागते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
रात्रीचे जेवण लवकर केल्याने वजन वाढण्याची समस्या कमी होते. संध्याकाळी जेवण केल्याने तुमची चयापचय गती वाढते, ज्यामुळे तुमचे अन्न झोपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पचते आणि रात्री भूक लागत नाही.
रक्तातील साखर नियंत्रित करते
रात्री लवकर जेवण केल्याने तुमच्या शरीरात अन्न पचण्यास वेळ मिळतो आणि सर्व पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषली जातात. रात्रीचे जेवण लवकर केल्याने तुमचे शरीर इन्सुलिनचा अधिक चांगला वापर करू शकते तसेच, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही, त्यामुळे मधुमेह, हृदयविकारचा धोका नसतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :