MPSC Exam 2024 : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर, कृषी सेवेच्या पदांचा समावेश
MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
पुणे : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकली होती. कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश त्या परीक्षेत करण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. तर, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 23 सप्टेंबरला बैठक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्या बैठकीनंतर कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेत करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याशिवाय नव्यानं परीक्षेची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
नागरी सेवा पूर्व परीक्षा कधी होणार?
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं डिसेंबर 2023 ला जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी ही परीक्षा 274 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. राज्य सरकारनं मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करत 10 टक्के आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण फेब्रुवारी 2024 मध्ये देण्यात आल्यानंतर शुद्धपत्रक जाहीर करुन 524 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर कृषी सेवेच्या पदांचा या परीक्षेत समावेश करण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्याशिवाय आयबीपीएस आणि राज्यसेवेची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं एमपीएससीनं परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी पुण्यात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी करत एमपीएससीनं परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. 1 डिसेंबर 2024 रोजी पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे.
राज्यसेवेच्या जागा वाढवाव्या : रोहित पवार
राज्यसेवा 2024 मध्ये कृषीसेवेच्या राजपत्रित जागांचा समावेश करून राज्यसेवेची तारीख जाहीर केल्याबद्दल आयोगाचे आभार मानत असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं. परीक्षेची तारीख थोड्या आधी घेता आली असती तर अधिक बरे झाले असते. सबंधित प्रश्नासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यापासून मंत्रालयापर्यंत दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसह सहभागी होता आलं याचं समाधान आहे. तसंच शरद पवार साहेबांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानत असल्याचं रोहित पवार म्हणाले.
राज्यसेवेच्या जागावाढीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. राज्यसेवा जागावढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयोगासह शासनाने देखील सकारात्मकता दाखवावी, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://t.co/h76NBDFiPs
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 23, 2024
इतर बातम्या :