राष्ट्रीयकृत बँकेतील दोन लाख पदं तात्काळ भरा; बँक कर्मचाऱ्यांचा लातुरात कॅन्डल मार्च
Latur News: राष्ट्रीयकृत बँकेमध्ये दोन लाख पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा तात्काळ भराव्यात या मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला आहे.
Maharashtra Latur News: राष्ट्रीयकृत बँकेतील दोन लाख पदं तात्काळ भरावी, या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा लातूर (Latur News) येथे कॅन्डल मार्च (Candle March). मागील दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक नफा कमावणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेत कर्मचारी भरती (Nationalized Bank Recruitment) का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीयकृत बँकेमध्ये दोन लाख पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा तात्काळ भराव्यात या मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला आहे. कायमस्वरूपी नोकर भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सरकार काम करून घेत आहे. याचा थेट फटका ग्राहकांना बसतोय. बँकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
गुरुवारी लातूर शहरातील राष्ट्रीयकृत बँकेतील जवळपास 100 कर्मचारीनी दैनंदिन कामकाज संपल्यानंतर कॅन्डल मार्च काढला. या मागचं मुख्य कारण होतं, राष्ट्रीयकृत बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. शिपाई आणि क्लर्क पदाच्या रिक्त जागा आहेत. मागील अनेक वर्षांपासून या जागा सरकार भरत नाहीये. त्या ठिकाणी नऊ ते दहा हजार रुपयांवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम ग्राहक सेवेवर होत आहे. बँकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर यामुळे कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. मात्र, त्याचवेळी सरकार हे सांगतंय की, मागील दहा वर्षांत राष्ट्रीयकृत बँकेनं कधी नव्हे तो मोठ्या प्रमाणात नफा कमवला आहे. दोन लाख पदं रिक्त ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शोषण करून हा नफा कमवला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
देशातील बेरोजगारीचं प्रमाण 10.40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढा नफा कमवलेला आहे. स्थिती स्पष्ट असताना मग सरकार दोन लाख लोकांना कायमची नोकरी का देत नाही? असे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलनाची भूमिका घेत आहोत. हे आंदोलन आम्ही आज घडीला आमचं दैनंदिन कामकाज संपवून करतोय. येत्या काळात आमची मागणी मान्य नाही झाली तर विविध ठिकाणी संप बंद ठिय्या आंदोलन आणि काम बंद आंदोलन हाती घेण्याचा मानस असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्पलॉयी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
राष्ट्रहिताचा विचार करत देशातील पाच लाख बँक कर्मचाऱ्यांनी या नोकर भरतीसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यासाठी देशातील राज्यानुसार विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार विविध स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील शंभराच्या आसपास कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कॅन्डल मार्च काढला होता. यावेळी या कर्मचाऱ्यांनी विविध मागणीचे फलक हातात घेत कॅन्डल मार्च काढला होता. जोरदार घोषणाबाजी करत बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्डल मार्च काढत आपला रोष व्यक्त केला आहे.