IAS, IPS होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, सरकार देणार मोफत प्रशिक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या राज्यात शेकडो विद्यार्थी आहेत, जे आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करतात. पण काही विद्यार्थ्यांना यात यश येते तर बहुसंख विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागते.
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने स्पर्धा परीक्षेसची तयारी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण करून दिली आहे. बार्टीतर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती यासाठी मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यासाठी बार्टीतर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत. 3 जुलै 2024 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.
कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार प्रशिक्षण
बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक, (आयबीपीएस) रेल्वे, एलआयसी व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील.
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील बार्टीमार्फत सन 2024-25 करिता वरील परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी हे अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज करण्यासाठी काय पात्रता हवी?
अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे गरजेचे आहे.
>>> उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
>>> उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असणे गरजेचे आहे.
>>> उमेदवाराचे वय वरील परीक्षांच्या अटी व शर्तीनुसार असावे.
>>> आर्थिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असणाऱ्या उमेदवारालाच त्यासाठी अर्ज करता येणार आहे.
>>> अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उणेदवाराकडे महाराष्ट्र शासानाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
>>> उमेदवार दिव्यांग असल्यास 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणापत्राची साक्षांकित प्रत सदार करावी.
या पूर्व प्रशिक्षणासाठी आरक्षण खालीलप्रमाणे असेल
>>> महिलांसाठी 30 टक्के आरक्षण असेल.
>>> दिव्यांगांसाठी 5 टक्के आरक्षण असेल.
>>> वंचित 5 टक्के आरक्षण असेल. (वाल्मिकी व तत्सम जाती-लोहार, बेरड, मातंग, मांग, मागदी इत्यादीसाठी)
निवडीचा निकष काय असेल?
या प्रशिक्षणासाठी पात्र ठरायचे असेल तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी http://trtipune.in/bartregmay24/ लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 3 जुलै 2024 आहे.
हेही वाचा :
भारतातील तरुणांना जर्मनीत नोकरी करण्याची संधी, थेट ड्रायव्हर म्हणून मिळणार जॉब!