Agnipath Scheme : अग्निपथ योजनेला विरोध होत असताना वायुसेनेत भरती प्रक्रियेला सुरुवात, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
Agnipath Scheme Recruitment : भारतीय वायुसेनेमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते 31 जुलै या दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
Agnipath Scheme Recruitment : केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेविरोधात (Agneepath Scheme) देशभरात आंदोलनं सुरु असताना आजपासून भारतीय वायुसेनेमध्ये आजपासून अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते 31 जुलै दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. भारतीय वायुदलात अग्निपथ योजने अंतर्गत भरतीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया 5 जुलैपर्यंत सुरु राहील. यानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळेल.
30 डिसेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात
भारती वायुसेनेसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते 31 जुलै या दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. यानंतर 21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान शारीरिक चाचणी होईल. त्यापुढे 29 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबरपर्यंत वैद्यकीय चाचणी होईल. यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी 1 डिसेंबर रोजी जारी करण्यात येईल. यानंतर 30 डिसेंबरपासून त्यांच्या प्रशिक्षणाला (Training) सुरुवात होईल.
योजनेला देशभरातून मोठा विरोध
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सैन्यात भरती प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि लष्कराने अग्निपथ योजनेची घोषणा केली. अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या 75 टक्के सैनिकांना चार वर्षांनी निवृत्त व्हावं लागेल. लष्करात अवघ्या चार वर्षांसाठी निवडीबाबतच्या या योजनेला देशभरात विरोध होत आहे. या योजनेला सर्व राज्यातील विद्यार्थी विरोध करत रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षही सरकारच्या योजनेला सातत्याने विरोध करत आहेत. मात्र, ही योजना मागे घेतली जाणार नसून याअंतर्गत पुढील भरती होणार असल्याचं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अग्निवीरांसाठी 'या' सुविधा
भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे की, अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच भत्ता मिळेल. सर्व अग्निवीरांना वर्षातून 30 दिवसांची सुट्टी मिळेल. प्रत्येक अग्निवीरला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. याशिवाय सेवेदरम्यान वीरगती आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल. अग्निवीरांना कॅन्टीन सुविधा देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यासोबतच चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना अनेक सरकारी सेवांमध्ये आरक्षण आणि प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही वायू दलाने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Agnipath Scheme : अग्निपथ योजनेच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा आक्रमक, आज ठिकठिकाणी करणार आंदोलन
- Agnipath Scheme: पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्करप्रमुखांची घेतली भेट, अग्निपथ योजनेवर झाली चर्चा
- Agneepath Scheme : अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेला सुरूवात, काय आहेत नियम आणि अटी?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI