एक्स्प्लोर
गंभीर - उथप्पा टीम इंडियात पुनरागमन करणार?

मुंबई : सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेणाऱ्या गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांना चांगल्या कामगिरीचं फळ मिळू शकतं. कारण कोलकाता नाईट रायडर्सच्या या खेळाडूंना टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी आहे, असं भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे. मोहालीत काल कोलकाता नाईट रायडर्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून यंदाच्या आयपीएलमधला तिसरा विजय साजरा केला. कोलकात्याच्या रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीरनं 82 धावांची सलामी दिली. रॉबिन उथप्पानं 28 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीनं 53 धावांची खेळी उभारली. तर गौतम गंभीरनं 34 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीनं 34 धावा केल्या. गंभीर आणि उथप्पा यांचा सध्याचा फॉर्म पाहता, ते टीम इंडियात पुनरागमन करू शकतात. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते गंभीरमध्ये अजूनही टीम इंडियात पुनरागमन करण्याची क्षमता आहे. "सध्या गंभीर ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय, ते पाहता त्याचं पुनरागमन होऊ शकेल. त्याला या फॉर्ममध्ये खेळताना पाहून आनंद वाटतोय" असं गावसकर म्हणाले. दुसरीकडे माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्राने ट्विट करून रॉबिन उथप्पाचं कौतुक केलं आहे. उथप्पाची भारताच्या टी 20 संघात निवड व्हायला हवी, तुम्ही या मताशी सहमत आहात? असं ट्विट आकाश चोप्राने केलं आहे. गंभीरने आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत 226 धावा केल्या आहेत. सध्या तो धावा करणाऱ्यांच्या यादीत टॉप स्थानावर आहे. तर उथप्पाने 4 सामन्यात 33.50 च्या सरासरीने 134 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका अर्थशतकाचा समावेश आहे.
आणखी वाचा






















