Vikram Gokhale : घरातच मिळालं अभिनयाचं बाळकडू, मराठीसह हिंदीतही साकारल्या हरहुन्नरी भूमिका; सिनेसृष्टीतल्या नटसम्राटाचा 'विक्रमा'दित्य प्रवास
Vikram Gokhale : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सिनेसृष्टीतील अनेक गाजलेल्या भूमिका त्यांच्या नावावर केल्या आहेत.
Vikram Gokhale : भूमिका घेणारा आणि ती भूमिका खऱ्या अर्थाने जगणारा कलावंत म्हणून विक्रम गोखले (Vikram Gokhale) हे सिनेसृष्टी आणि मराठी रसिक प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात आहे. रंगभूमी, मोठा पडदा, मालिकाविश्व अशा तिन्ही माध्यमांवर विक्रम गोखलेंनी अधिराज्य केलं. त्यांची प्रत्येक भूमिका मराठीच नाही हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या मनातही अगदी खोलवर रुजली आहे. त्यामुळे आजही विक्रम गोखले यांची कलाकृती ही प्रेक्षकांसाठी खासच असते. आज विक्रम गोखले यांचा वाढदिवस आहे.
विक्रम गोखले यांना अभिनयाचं बाळकडू हे त्यांच्या घरातूनच मिळालं. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या.तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजेच कमलाबाई कामत यादेखील अभिनेत्री होत्या. तसेच त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी देखील सिनेसृष्टीत काम केलं आहे. अशा घरात अभिनयाचे धडे गिरवताना विक्रम गोखले नावाचा हिरा मराठी रंगभूमीला गवसला असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 1971 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. या सिनेमाचे नाव 'परवाना' असं आहे.
भूमिका जगणारे विक्रम गोखले!
कोणती भूमिका ही त्यांच्या कठोर अभिनयाने प्रेक्षकांसाठी हळवी होऊन जायची. हिच त्यांच्या अभिनयाची खासियत होती. 'अग्निहोत्र' मालिकेत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका प्रेक्षकांना आजही तितकीच भावते. अगदी हल्लीच्या स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतही विक्रम गोखले दिसले होते. 'या सुखानों या', माहेरची साडी, वजीर 'एबी आणि सीडी', 'नटसम्राट', 'थोडं तुझं थोडं माझं', 'कळत नकळत', 'दुसरी गोष्ट', 'अनुमती', 'मी शिवाजी पार्क', 'आघात' अशा अनेक सिनेमांमध्ये विक्रम गोखले यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'स्वर्ग नरक', 'इंसाफ', 'अग्निपथ', 'खुदा गवाह', 'अर्धम', हम दिल दे चुके सनम यांसारख्या सिनेमांमध्ये लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या. ऐश्वर्या रायच्या वडिलांच्या भूमिका ही आजही अनेकांच्या लक्षात राहणारी ठरली आहे.
त्यांनी 'उडान', 'क्षितिज ये संजीवनी', 'जीवन साथी', 'सिंहासन', 'मेरा नाम करेगी रोशन' या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे.अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे.2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.