दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास
राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम करत विजयवाडा पूर्व मतदारसंघातून 1999 ते 2004 दरम्यान आमदार म्हणून जबाबदारी पार पाडली. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Kota Shrinivas Rao Passed Away: तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कोटा श्रीनिवास राव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली असून, हे चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान असल्याचे सांगितले आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "आपल्या बहुमुखी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारे कोटा श्रीनिवास राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांचे कलात्मक योगदान आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय राहतील. त्यांनी खलनायक, विनोदी आणि चरित्र भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यांच्या जाण्याने तेलुगू चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे." तसेच, नायडू यांनी त्यांच्या राजकीय योगदानाचा उल्लेख करत सांगितले की, "1999 मध्ये विजयवाडा येथून आमदार म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली होती. त्यांच्या कुटुंबियांना मी मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो."
750 हून अधिक चित्रपटांचा प्रवास
कोटा श्रीनिवास राव यांनी १९७८ साली ‘प्रणम खारीदू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ७५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी खलनायक, सहाय्यक अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
अनेक पुरस्कारांनी सन्मान
त्यांच्या उल्लेखनीय अभिनयासाठी राव यांना ९ वेळा 'नंदी पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता. २०१५ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री'ने सन्मानित केले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘दम्मू’, ‘सन ऑफ सत्यमूर्ती’, ‘डेंजरस खिलाडी’ यांचा समावेश होता. ते फक्त तेलुगूच नव्हे, तर तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही सक्रिय होते. राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम करत विजयवाडा पूर्व मतदारसंघातून 1999 ते 2004 दरम्यान आमदार म्हणून जबाबदारी पार पाडली. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील.
हेही वाचा























