(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonali Phogat Death : टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हत्येप्रकरणी दोघांना अटक, पीए सुधीर सांगवान याचा समावेश असल्याचा संशय
Sonali Phogat Death Case: सोनाली फोगाट हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली आहे.
Sonali Phogat Death : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat Death Case) हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली आहे. सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदनात त्यांच्या शरीरावर जखमा झाल्याचं दिसून आलं होतं. त्यावरुन सोनाली फोगाट यांची हत्या ही नैसर्गिक नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.
सोनाली फोगाट हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोनाली यांच्या शरीरावर जखमा झाल्याचं दिसून आलं आहे. या संबंधी अधिक तपास हा सुरु असून या मृत्यूचे नेमकं कारण काय याचा शोध घेतला जात आहे.
टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली यांना भाजपकडून हिसारमधून उमेदवारी देण्यात आली होती. रियॅलिटी शो 'बिग बॉस'मुळेही (Big Boss) सोनाली फोगाट चर्चेत आल्या होत्या. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांना 23 ऑगस्ट रोजी मृत घोषित केलं होतं.
सोनाली फोगाट आणि वाद!
सोनाली फोगाट या अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या होत्या. जून 2020 दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोनाली फोगाट एका अधिकाऱ्याला चप्पल मारताना दिसल्या होत्या. सोशल मीडियावरील या वादामुळे बराच गदारोळ झाला होता. यानंतर सोनाली फोगाट यांनी त्यांची बहीण आणि भावाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यामुळे देखील त्या चर्चेत आल्या होत्या. यांनंतर त्या त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेत आल्या होत्या. ‘बिग बॉस 14’च्या घरात त्यांनी आपल्याला अली गोनी आवडतो, असे म्हटले होते. यावरून घरात बराच वाद झाला होता.
सोनाली फोगाट 2019 दरम्यानच्या त्यांच्या एका भाषणामुळे देखील वादात अडकल्या होत्या. हिसारमधील एका गावात रॅलीदरम्यान त्यांनी लोकांना 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यास सांगितले होते. जे लोक घोषणा देत नाहीत, ते नक्कीच पाकिस्तानचे आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर सोनाली फोगाट यांना त्याच्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली होती.
सोनाली फोगाट कोण आहेत?
- हरियाणातली भूथनकला गावात जन्म.
- 2006 साली दूरदर्शनसाठी काम सुरु केलं.
- 2008 साली भाजपमध्ये प्रवेश केला.
- राजकारणासह सिनेसृष्टीतही काम सुरु केलं.
- पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट आणि म्यूझिक व्हिडियोत काम.
- छोरियां छोरों से कम नहीं होती हा पहिला चित्रपट.
- 2016 साली त्यांच्या पतीचा रहस्यमय मृत्यू.
- 2019 मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली.
- 2020 साली बिग बॉसमध्येही सहभागी होत्या.