समोरुन येणाऱ्या कारची जोरदार धडक, एअरबॅग्स उघडले अन्... प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत भीषण अपघात
'कुमकुम भाग्य' आणि 'बिग बॉस OTT' सारख्या शोमुळे घराघरात ओळख निर्माण केलेल्या या अभिनेत्याच्या कारचा 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री जोरदार अपघात झाला.

मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता जीशान खान (Zeeshan Khan) यांचा मुंबईतील वर्सोवा भागात भीषण अपघात झाला आहे. 'कुमकुम भाग्य' आणि 'बिग बॉस OTT' सारख्या शोमुळे घराघरात ओळख निर्माण केलेल्या या अभिनेत्याच्या कारचा 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री जोरदार अपघात झाला. सुदैवाने जीशान सुरक्षित असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात कसा झाला?
'बॉलिवूड बबलने दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता मुंबईच्या वर्सोवा परिसरात त्याची काळी कार आणि एक ग्रे रंगाची कार समोरासमोर धडकली. धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, एअरबॅग्स तात्काळ उघडल्यामुळे झीशानचे प्राण वाचले. अपघातानंतर तो सुरक्षित आहे, मात्र धक्क्यात असून वैद्यकीय तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीचा पुढील भाग पूर्णपणे मोडून पडल्याचं दिसून आलं. अपघातानंतर जीशान तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले. मात्र तक्रार नोंद झाली आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जीशान खानचे करिअर
जीशान खानने 2019 ते 2021 दरम्यान ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत आर्यन खन्ना ही भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तो ‘नागिन 6’, ‘लॉक अप’‘सारख्या प्रोजेक्ट्समध्ये दिसला. तसेच तो ‘बिग बॉस OTT सीझन 1’चा भाग राहिला होता. त्याच्या खेळामुळे आणि वागण्यामुळे त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.
वैयक्तिक जीवन पुन्हा चर्चेत
सध्या जीशान टीव्हीपासून दूर असून म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचं नाव अभिनेत्री रेहाना पंडितसोबत विशेष चर्चेत राहिलं. दोघांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या लिपलॉक फोटोमुळे मोठा गाजावाजा झाला होता. 2021 मध्ये सुरू झालेलं नातं एप्रिल 2023 मध्ये तुटलं, मात्र 2024 मध्ये दोघांनी पुन्हा पॅचअप झाल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे रेहाना पंडित या जीशानपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. या अपघातानंतर जीशान सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी त्यांच्या कारचा चक्काचूर झालेला व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांनी त्यांच्या प्रकृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली असून मोठ्या अपघातातून बचावल्यामुळे चाहत्यांच्याही जीवात जीव आलाय.























