(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘अरे आव्वाज कुणाचा’;आरोळ्या पुन्हा एकदा घुमणार!, पुरुषोत्तम करंडकच्या अंतिम फेरीत 9 संघांची धडक
Purushottam Karandak : नाट्यश्रेत्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुरुषोत्तम करंडकची अंतिम फेरी ही 22 आणि 23 जानेवारीला होणार आहे.
पुणे : महाविद्यालयांतील नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ महाविद्यालयांची निवड झाली आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारीला या अंतिम फेरी रंगणार असून त्यात कोण बाजी मारणार याची नाट्यरसिकांना उत्सुकता आहे. त्यामुळे आता ‘अरे आव्वाज कुणाचा’ अशा आरोळ्या पुन्हा एकदा घुमणार आहेत.
पुरुषोत्तम करंडकाच्या अंतिम फेरीसाठी निवडलेले संघ-
1 - कंप्लीट व्हॉईड - आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे
2 - भाग धन्नो भाग - मॉडर्न महाविद्यालय
3 - पाणीपुरी - गणेशखिंड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे
4 - वरात - आय एम सी सी.
5 - सफर - कावेरी महाविद्यालय, पुणे.
6 - कला? - प. भू. वसंतदादा पाटील इंस्टी ऑफ टेक्नोलॉजी बावधान.
7 - मंजम्मा पुराणम् - बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
8 - एव्री नाइट इन माय ड्रीम्स - श्रीमती काशीबाई नवले, अभियांत्रिकी
9 - सहल - पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर.
महाविद्यालयाचा अविभाज्य घटक असलेल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी 3 ते 17 जानेवारीदरम्यान पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा झाली नाही. महाराष्ट्रीय कलोपासक पुणे पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा 1963 पासून सुरू आहे. या स्पर्धेचे हे यंदाचे 56 वे वर्ष आहे.
या स्पर्धेत दरवर्षी 51 महाविद्यालय सहभाग घेतात. 2021 च्या प्राथमिक फेरीत एकूण पन्नास संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 49 महाविद्यालयांनी एकांकिका सादर केल्या होत्या. दरवर्षी नऊ संघ अंतिम फेरीसाठी पात्र होतात. २२ जानेवारी आणि २३ जानेवारीला अंतिम फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीचे परीक्षक विश्वास करमरकर, मयुरेश कुलकर्णी, मंदार पटवर्धन हे होते.
महाविद्यालयीन जगतातच, त्या वातावरणातच स्पर्धा व्हावी अशी कल्पना असल्यामुळे फर्गुसन महाविद्यालयाच्या 'अम्फी थियेटर मध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती. त्यानंतर भरत नाट्य मंदिरात ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे तांत्रिक विभागासाठी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत कुठलेही पारितोषिक नाही. विद्यार्थ्यांनी कुठल्याही तांत्रिक बाबीमध्ये फार न अडकता नाटकाचा विषय लेखन, वाचिक, आंगिक, मुद्राभिनय याकडे प्रामुख्याने लक्ष्य दिले पाहिजे असा आहे. लेखन विद्यार्थ्यांचेच असावे असे आजही असे बंधन मात्र या स्पर्धेत नाही. जुन्या एकांकिकासुद्धा नव्या विचारांनी प्रेक्षकांसमोर जे मांडण्याचे नियम आव्हान विद्यार्थी या स्पर्धेत घेतात. त्याचबरोबर एकांकिकेची सर्व तयारी विद्यार्थ्यांनीच केली पाहिजे हा प्रमुख नियम आहे. पुरुषोत्तम करंडकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे इथे हौशी रंगभूमीबरोबरच प्रायोगिक रंगभूमीवरच्या विषयाचा देखील कस लागतो. चाकोरीबाहेरच्या विषयाला हात घालून तो वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान पेलणाऱ्या संघाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी के जयराम हर्डीकर पारितोषिक दिले जाते. म्हणूनच पुरुषोत्तम करंडकाबरोबरच कै. जयराम हर्डीकर पारितोषिक मिळवणे हे प्रत्येक महाविद्यालयाचे स्वप्न असते.
महत्त्वाच्या बातम्या :