Mumbai News : शनिवार, रविवार नाट्यगृहात राजकीय कार्यक्रम ठेवू नका; नाट्यधर्मी निर्माता संघाचं मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
Mumbai News :शनिवारी आणि रविवारी नाट्यगृहात कुठलेही राजकीय कार्यक्रम ठेवू नका, अशी मागणी नाट्यधर्मी निर्माता संघाने केली आहे. याबाबत नाट्यधर्मी निर्माता संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहिलं आहे.
Mumbai News : शनिवारी आणि रविवारी नाट्यगृहात (Theater) कुठलेही राजकीय कार्यक्रम ठेवू नका, अशी मागणी नाट्यधर्मी निर्माता संघाने केली आहे. याबाबत नाट्यधर्मी निर्माता संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना पत्र लिहिलं आहे. राजकीय कार्यक्रमांमुळे नाटकाचे (Drama) शो रद्द झाल्याने नाट्यनिर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान आज (4 नोव्हेंबर) सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत नाट्यनिर्मात्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे.
पत्रात काय मागणी केली?
शनिवार, रविवार सुट्टी असल्याने अनेक नाट्यगृहांमध्ये नाटकाचे शो हाऊसफुल्ल असतात. अशामध्येच शनिवार आणि रविवारी अचानक राजकीय कार्यक्रम नाट्यगृहांनी घेतल्यानंतर आधीच बुक केलेले नाटकाचे शो रद्द केले जात असल्याचं समोर आलं आहे. राजकीय कार्यक्रमांमुळे ऐनवेळी नाटकाचे शो रद्द करावे लागत असल्याने नाट्यनिर्मात्यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ऑनलाईन त्यासोबत 'बुक माय शो'वर नाटकांची बुकिंग प्रेक्षकांनी केल्यानंतर जर एखादं नाटक अचानक रद्द केलं तर सर्व पैसे नाट्यनिर्मात्यांना प्रेक्षकांचे परत करत दिलगिरी सुद्धा व्यक्त करावी लागत आहे. त्यामुळे राज्यातील नाट्यगृह हे नाटकातील प्रयोगासाठीच राखीव ठेवावेत आणि राजकीय कार्यक्रम मोकळ्या जागी किंवा मैदानावर घ्याव्यात, अशा प्रकारची मागणी नाट्यधर्मी निर्माता संघाने मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांकडे केली आहे.
नाट्यनिर्मात्यांना मोठा आर्थिक फटका
या संदर्भात नाट्यधर्मी निर्माता संघाचे कार्यवाहक आणि नाट्यनिर्माता दिलीप जाधव यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. "मागील काही दिवसांमध्ये ऐनवेळी विविध पक्षांचे राजकीय कार्यक्रम नाट्यगृहात होत असताना पाहायला मिळत आहे. ऐनवेळी कार्यक्रम जाहीर करुन राजकीय पक्ष हे नाट्यगृह बुक करत आहेत. अशावेळी तीन महिने आधीच नाटकाचे प्रयोग या नाट्यगृहात बुक असताना नाईलाजास्तव नाट्यगृह मालकांना नाटकाचा शो रद्द करुन राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला नाट्यगृह द्यावे लागत आहे. त्यामुळे नाट्यनिर्मात्यांना बसणारा आर्थिक फटका मोठा असल्याने तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा विनंतीचं पत्र नाट्यनिर्मात्यांनी लिहिलं आहे," असं नाट्यधर्मी निर्माता संघाचे कार्यवाह दिलीप जाधव यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं.