धुळ्यातील भुषण पाटीलच्या 'मेल फिमेल' लघुपटाला 'स्टँडअलोन फिल्म फेस्टिव्हल'चा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर
मेल फिमेल या लघु चित्रपटाला लिफ्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकनासह एकूण 18 नामांकने मिळाली आहेत.
धुळे : धुळे शहरातील भूषण संजय पाटील या अवघ्या 23 वर्षांच्या तरुण युवकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेल्या 'मेल फिमेल' या 45 मिनिटांच्या लघु चित्रपटाला चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके जजेस पुरस्कार गेल्या महिन्यात जाहीर झाला. आता या चित्रपटाला स्टँड अलोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट प्रायोगिक चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. भुषण पाटील हा सध्या दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे शिक्षण घेत आहे.
धुळे शहरातील मूळचा रहिवासी असणारा आणि सध्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे पदवी शिक्षण घेत असलेल्या भूषणने लॉकडाऊनच्या काळात धुळे येथे एका हॉलमध्ये या लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. शहरात उच्चशिक्षित तरुण बेरोजगारीने नैराश्य अवस्थेत तर पत्नी नोकरी करत घर संसार सांभाळून बेरोजगार नवऱ्यासाठी नोकरी शोधत फिरते. तर नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असतो. जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जात असताना देखील नवऱ्याला हिंमत आणि धीर देणारी पत्नी असे कथानक आहे.
यात कलाकार तेजस महाजन, करिष्मा देसले, चित्रीकरण पंकज पाटील, कला दिग्दर्शन शरद जाधव, वेशभूषा अनिल प्रधान, साऊंड डिझायनिंग दूर्वा महाजन यांनी केले आहे. या चित्रपटाची माउंटेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली. तसेच टागोर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड, शॉर्ट टीव्ही चित्रपट महोत्सवात निवड, इंडियन फिल्म हाऊस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन, लिफ्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन असे एकूण 18 नामांकने मिळाली आहेत.
भूषण संजय पाटील याने घर पावसातलं, दोनच रंग, टिंब टिंब, तस्करी, दुल्हन ठगिया, या एकांकिकेचे लेखन केले असून घर पावसातलं, टिंब टिंब, तस्करी या एकांकिकांना पारितोषिक मिळाले आहे. तसेच लघु चित्रपटाचे लेखन केले आहे. यासोबत भूषणने गोडसे गांधी डॉट कॉम, अधांतर, माकडाच्या हाती शॅम्पेन, सखाराम बाईंडर, रेनकोट, तंट्या भिल, तस्करी, कर्ण गाथा, येथे ओशाळला मृत्यू, औरंगजेब अंजली द परफेक्ट संन्यासी, देवदासी, परतीच्या वाटेवर दिव्य या सह 30 पेक्षा जास्त नाटकात भूमिका केल्या आहेत. तसेच त्याने लोकनाट्य संगीत लेखन दुल्हन ठगिया व पोस्टर इन्कलाब केले आहे.
तसेच बोन्साय, अँटीगनी, हेल्मेट, तस्करी, इतिहास यांचे दिग्दर्शन केले आहे. येथे ओशाळला मृत्यू या नाटकाला संगीत दिल्याबद्दल व राणीमाशी या एकांकिकेला त्याने प्रकाश योजना दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहेत. नाट्य व चित्रपट सृष्टीतील सर्व कला अवगत असलेल्या भूषणला 11 वा दादासाहेब फाळके जजेस पुरस्कार मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नाट्यशास्त्रात विशेष प्राविण्य पदवी संपादन केली आहे. त्यानंतर आशिया खंडातील नाट्य क्षेत्रात सुप्रसिद्ध प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्याला प्रवेश मिळाला असून सध्या प्रशिक्षण घेतो आहे.