The Indrani Mukherjee Story : नेमकं तेव्हा काय घडलं होतं? अखेर 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' नेटफ्लिक्सवर रिलीज
The Indrani Mukherjee Story : हायकोर्टाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' ही डॉक्युमेंट्री सिरिज ओटीटीवर रिलीज करण्यात आली आहे.
The Indrani Mukherjee Story : 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' (The Indrani Mukherjee Story) या डॉक्युमेंट्री सिरिजची सध्या बरीच चर्चा होती. ऐन रिलीजच्या दिवशी या सिरिजला हायकोर्टानं दणका देत सिरिजचं प्रदर्शन थांबवलं होतं. पण हायकोर्टानं सिरिजचं स्पेशल स्क्रिनिंग केल्यानंतर आता ही सिरिज ओटीटीवर रिलीज करण्यात आली आहे. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' ही डॉक्युमेंट्री सिरिज 1 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित करण्यात आलीये.
नेटफ्लिक्सकडून या सिरिजचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. हा प्रोमो शेअर करत नेटफ्लिक्सने म्हटलं आहे की, 'काही प्रश्न तुम्हाला नेहमीच त्रास देतात आणि काही रहस्ये कधीच दूर होत नाहीत. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' आता फक्त नेटफ्लिक्सवर इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये पहा. या सिरिजमध्ये एकूण 4 भाग आहेत.
Some questions will haunt you forever, and some secrets refuse to fade away. Watch The Indrani Mukerjea Story: Buried Truth, now streaming in English, Hindi, Tamil and Telugu only on Netflix. pic.twitter.com/O1dXKvQkaN
— Netflix India (@NetflixIndia) February 29, 2024
हायकोर्टानं थांबवलं प्रदर्शन
ही डॉक्युमेंट्री 22 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होती. पण मुंबई हायकोर्टाने या सिरिजचे प्रदर्शन थांबवले होते. पण त्यानंतर हायकोर्टाकडून परवानगी देण्यात आहे. या सिरिजमध्ये शीना बोरा हत्याकांडाविषयी दाखवले जाणार आहे. 2015 मध्ये इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली अटक झाल्याने संपूर्ण देश हादरला होता. त्याचीच गोष्य या सिरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.
शिना बोरा हत्या प्रकरण
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं.
इंद्राणीनं वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयनं कटात सहभागी असल्यानं पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.