झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको घेणार निरोप; तर 'अग्गंबाई सासूबाई' होणार 'अग्गंबाई सुनबाई'
गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रिय ठरलेली 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका व्यक्तिरेखा तशाच ठेवून कथांनक बदललं जाणार आहे. आता ही मालिका 'अग्गंबाई सुनबाई' अशी होणार आहे. तर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मुंबई : झी मराठी वाहिनीने आता रसिकांचे मनोरंजन कारण्यासाठी कंबर कसली आहे. आता अनेक नव्या मालिकांसह काही मालिका चकित करणारं वळण घेणार आहेत. यात सगळ्यात महत्वाची बातमी अशी की, माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 7 मार्चला या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. तर त्या जागी 8 मार्चपासून घेतला वसा टाकू नको ही मालिका सुरु होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रिय ठरलेली 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका व्यक्तिरेखा तशाच ठेवून कथांनक बदललं जाणार आहे. आता ही मालिका 'अग्गंबाई सुनबाई' अशी होणार आहे. यात आता आसावरी कर्तबगार होणार आहे. तर अशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान यांच्याजागी नवे चेहरे दिसणार आहेत. याचे काही प्रोमोही आले आहेत. मार्च महिन्याच्या प्रत्येक सोमवारी नवी मालिका आणण्याचा मानस चॅनलचा आहे.
उत्सव नात्यांचा नव्या कथांचा
महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवीन कथा घेऊन मार्च महिन्यात 'झी मराठी' नवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मार्च महिन्यात दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापैकी 'पाहिले न मी तुला' या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली असून 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा नाईकही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मनोरंजनाचा विचार करताना पुढच्या काळात 'उत्सव नात्यांचा, नवीन कथांचा' या घोषवाक्यासह झी मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. राज्याच्या विविध भागातील लेखकांनी लिहिलेल्या कथा मालिकारूपात पाहायला मिळणार असून मार्चमध्ये दर रविवारी एक सोहळा आणि दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे,' अशी माहिती 'झी मराठी' चे व्यवसायप्रमुख निलेश मयेकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि भारताबाहेरही मराठी माणसांचे विश्व आहे. त्याही कथांवर आधारित मालिका सुरु करण्यात येणार असल्याचे मयेकर यांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी 'रात्रीस खेळ चाले' मालिकेचे दुसरे पर्व लोकांनी पाहिले. या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि 'अण्णा नाईक' ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यामुळे नवीन वर्षांत अण्णा नाईक आणि त्यांचा खेळ पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र मालिकेचे हे तिसरे पर्व आहे की वेगळे कथानक पाहायला मिळणार, याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे. मालिकेच्या नवीन पर्वाच्या पटकथा आणि लेखनाची जबाबदारी पुन्हा एकदा प्रल्हाद कुडतरकर आणि राजेंद्र घाग यांच्या खांद्यावर आहे. राजेंद्र घाग रत्नागिरीचे असून ते सिंचन विभागात कार्यरत होते. आपली नोकरी सांभाळून मासिकांत कथा लिहिणाऱ्या घाग यांनी साठाव्या वर्षी पहिल्यांदा मालिकेसाठी लेखन केले. याशिवाय, 'पाहिले न मी तुला' ही आणखी एक नवीन मालिका सुरु होणार असून यात अभिनेता शशांक केतकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या वाहिनीवर सुरु असलेल्या 'माझा होशील ना' या मालिकेत सुयश पटवर्धनची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कुलकर्णी आणि नवोदित अभिनेत्री तन्वी मुंडले हे दोघेही नव्या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
राज्याच्या विविध भागातील नव्या दमाचे लेखक वाहिनीशी जोडले गेले आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचा लेखक तेजस घाडगेने पहिल्यांदाच इतकी मोठी मालिका केली होती. आता 'काय घडलं त्या रात्री' ही मालिका तो लिहितो आहे. सातारचा विशाल कदम आणि स्वप्निल गांगुर्डे यांनी मिळून 'देवमाणूस' मालिकेची कथा लिहिली आहे, या मालिकेचं दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. याआधी राजू सावंत यांनी या आधी तू तिथे मी, जय मल्हार, रात्रीस खेळ चाले ची दोन्ही पर्व, लागीर झालं जी यांसारखे दर्जेदार कार्यक्रम दिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Soham Bandekar | आई-वडिलांच्या पावलावर पाऊल, सोहम बांदेकरचं मनोरंजन क्षेत्रात पदार्पण
- PHOTO : व्हय, ही जब्याची शालूच हाय...! राजेश्वरी खरातचा सोशल मीडियावर जाळ आन् धूर संगटच!
- पुरस्कार आला पण पैसा गेला!
- मला माफ करा, पण मी वाईट माणूस नाही! मंदार देवस्थळी यांनी मांडली आपली स्थिती
- Natyaparishad | नाट्यपरिषदेचे हंगामी अध्यक्ष नरेंद्र गडेकरांचे कार्यकारिणी सदस्यत्व रद्द? हा खोडसाळपणा, नियामक मंडळाचा सूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
