Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'महिनाभर बेडरेस्ट होती पण जिद्द नाही सोडली', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या दिग्दर्शकाचं टीमनं केलं कौतुक!
Sukh Mhanje Nakki Kay Asta : सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. पण या मालिकेच्या दिग्दर्शकांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.
Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या ही मालिका बरीच रंजक वळणावर आहे. जयदीप आणि गौरीचा पुर्नजन्म झाला असून ते दोघेही पुन्हा एकदा एकत्र आलेत. तसेच शालिनी शिर्के पाटील ही 24 वर्षांनी पुन्हा एकदा कोल्हापुरात आलीये. तसेच आता शालिनी समोर नित्या आणि अधिराज आल्यानंतर मालिकेत काय होणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये आहे. पण ही मालिका सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलीये. या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे (Chandrakant Kanse) यांच्या जिद्दीचं कौतुक सध्या टीमकडून केलं जातंय.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचं दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांना चार आठवडे बेडरेस्ट सांगितली होती. पण एका महत्त्वाच्या प्रोमो शूटींगसाठी चंद्रकांत कणसे हे स्वत: सेटवर हजर राहिले आणि त्यांनी तो प्रोमो शूट केला. त्यांचं कामासाठी असलेलं हे डेडीकेशन पाहून प्रत्येकाने आपलं काम चोख करत हा प्रोमो शूट करताना तितकीच मेहनत घेतली. अभिनेता मयूर पवार याने चंद्रकांत कणसे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
नेमकं काय घडलं?
मयूरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, झालं असं की, मागच्या महिन्यात शूट संपवून घरी जात असताना चंदू सरांचा अपघात झाला.सरांना ४ आठवडे बेडरेस्ट सांगितली. चंदू सरांचं कामाबद्दल इतकं कमालीचं डेडीकेशन आहे की ते कधी सेटवर असताना सुद्धा बसत नाहीत. सीन कसा चांगला होईल ह्या किंवा लिहून आलेल्या सीन मध्ये आपण अजून काय करू शकतो ह्या विचारात ते सेटवर सतत येरझाऱ्या घालत असतात. आम्ही चंदू सरांना फक्त ब्रेक झाल्यावर जेवताना बसलेलं बघितलंय. त्या आधी किंवा त्या नंतर हा माणूस कधीच बसलेला दिसत नाही. जसजसे ४ आठवडे पूर्ण होत होते तसतशी चंदू सरांची कामाबद्दलची तळमळ वाढत होती.ते सतत सेटवर फोन करून सीन कसा करायला पाहिजे ह्याबद्दल शशी सरांशी चर्चा करत होते.
पुढे मयूरने म्हटलं की, शशी सर हे आपल्या मालिकेचे सह दिग्दर्शक. चंदू सरांच्या अनुपस्थितीत शशी सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सेट हाताळला आणि सर्व कलाकारांना हाताशी धरून मालिकेचं शूटिंग तितक्याच जोमात सुरू ठेवलं. ह्या दरम्यान एक प्रोमो शूट करायचा होता जो खूप महत्वाचा होता. हे कळल्यावर चंदू सरांना राहवेना. काहीही झालं तरी हा प्रोमो आपणच करायचा असं चंदू सरांनी ठरवलं आणि सेटवर फोन करून ‘मी येतोय’ असं सांगितलं.
'अन् तो प्रोमो चंदू सरांनीच शूट केला'
कामाप्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा चंदू सरांना सेटपर्यंत घेऊन आली. सर सेटवर येताच स्पॉट दादांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण खुश झाला आणि प्रत्येकात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. सरांना कुठलाही त्रास होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. दिग्दर्शकासाठी संपूर्ण टीम इतकी राबत असल्याचं, मालिकेच्या सेटवर खूप कमी पहायला मिळतं. चंदू सरांनी इतर कुठलाही विचार न करता, सेटवर येऊन प्रोमो दिग्दर्शित केला आणि नेहमीप्रमाणेच कमाल केली..! असा अनुभव मयूरने त्याच्या पोस्टमध्ये सांगितला आहे.
'सुख म्हणजे नक्की हेच असतं'
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्याची खऱ्या अर्थानं प्रचिती आली..! आमच्या मालिकेच्या पूर्ण टीमला खूप प्रेम..! चंदू सर लवकरात लवकर बरे व्हा.खूप काम करायचंय. बाकी तुमच्या आशीर्वादानं आणि आपल्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने आपला टी.आर.पी. वाढतच आहे, तो असाच वाढत राहो आणि लवकरात लवकर पुन्हा तुम्हाला सेटवर त्याच एनर्जीत बघायला मिळो, ही नटराजचरणी प्रार्थना..! तुम्ही ग्रेट आहात हे सांगायची गरजच नाही. लव्ह यू सर.! अशी पोस्ट मयूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर केली आहे.
View this post on Instagram