Ritiesh Deshmukh : बिग बॉसमध्येही झळकलं गुलाबी जॅकेट; रितेश भाऊने सांगितलं थेट 'बारामती' कनेक्शन
Ritiesh Deshmukh : धनंजयच्या गुलाबी जॅकेटवर कमेंट करत बारामती कनेक्शन सांगितलं आहे. सध्या या कनेक्शनची जोरदार चर्चा सुरु झालीये.

Ritiesh Deshmukh on Gulabi Sadi : महाराष्ट्रात सध्या दोन गोष्टी बऱ्याच चर्चेत आहेत एक लाडकी बहिण योजना आणि दुसरीकडे बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi New Season) कल्ला. महाराष्ट्रात युती सरकारकडून लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष थीमही ठरवण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर लाडकी बहिण योजना घोषित झाल्यापासून एका वेगळाच स्टाईलने त्याचा प्रचार केला. एरवी पांढऱ्याशुभ्र झब्बा घालणारे अजितदादा गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसू लागले. त्यातच आता हे गुलाबी जॅकेट बिग बॉसच्याही घरात पोहचलंय.
विशेष म्हणजे या जॅकेटची दखल खुद्द रितेश भाऊंनी घेतली आणि बारामती कनेक्शन सांगितलं. त्यामुळे आता हे गुलाबी जॅकेट बिग बॉसच्याही घरात झळकलं आहे. लाडकी बहिण योजनेसाठी अजित पवारांनी त्यांच्या ताफातल्या गाड्याही गुलाबी करुन टाकल्या. यामुळे महाराष्ट्राला अजित पवारांचा एक वेगळाच रंग पाहायला मिळाला. पण आता हाच रंग बिग बॉसच्याही घरात पोहचल्याचं पाहायला मिळतंय.
रितेश भाऊने सांगितलं बारामती कनेक्शन
दरम्यान या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर कोल्हापूरच्या धनंजय पोवारने गुलाबी जॅकेट घातलं होतं. त्यावर रितेश भाऊंनी धनंजयला म्हटलं की, धनंजय तुमचं जॅकेट खूप छान आहे. टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय. कारण ही तिकडची स्टाईल आहे आणि आता कोल्हापूरपर्यंत आलेली आहे,असं दिसतंय. त्यावर घरातले सगळेच सदस्य हसायला लागले. त्यावर धनंजयने देखील रितेश भाऊंचे आभार मानले.
अजित पवारांनी तातडीने शिवले 12 गुलाबी जॅकेट?
दरम्यान लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभेच्या दृष्टीने अजित पवार गटाकडून आता मोर्चेबांधणी सुरु करण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार असल्याची माहिती समोर आली. तसेच गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार हेदेखील प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यांनंतर अजित पवारांनी देखील पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली. त्यासाठी अजितदादांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचंही समजलं.अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.
ही बातमी वाचा :
Bigg Boss Marathi Season 5 : वोटिंग लाईन्स बंद तरीही अंकिता घराबाहेर? बिग बॉसमध्ये नवा ट्विस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
