Indian Idol : चित्रपट झाले आता नेटकरी करतायत 'बॉयकॉट' इंडियन आयडॉलची मागणी! नेमकं कारण तरी काय?
Indian Idol : इंडियन आयडॉल आणि वाद हे आता एक समीकरण बनलं आहे. नुकतीच या शोवर बंदी घालण्याची मागणी सुरु झाली आहे.
Indian Idol 13 : सध्या टीव्ही विश्वात रिअॅलिटी शोंचा सुळसुळाट झाला आहे. यातच नेहमीच चर्चेत असणारा रिअॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडॉल (Indian Idol). इंडियन आयडॉल आणि वाद हे आता एक समीकरण बनलं आहे. नुकतीच या शोवर बंदी घालण्याची मागणी सुरु झाली आहे. ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ आणि आता ‘इंडियन आयडॉल’बाबत वाद सुरू झाला आहे. इंडियन आयडॉलबद्दल पूर्वीही म्हटले जायचे की, हा शो आधीच स्क्रिप्टेड आहे. पण, आता चाहते या शोवर थेट बंदी घालण्याचीच मागणी करत आहेत. ‘इंडियन आयडॉल’च्या 13व्या सीझनमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या रिटो रिबाची निवड न झाल्याने प्रेक्षक संतापले आहेत.
काही वर्षांपूर्वी, गायकांना इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत होते. त्यांनंतर नवोदित गायकांना आपली प्रतिभा दाखवता यावी म्हणून ‘इंडियन आयडॉल’सारख्या (Indian Idol) मंचाची सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या शोमुळे कित्येक लोकांचे करिअर घडले. पण, आता या शोला पूर्वीसारखी रया राहिलेली नाही. या स्पर्धात्मक कार्यक्रमांचे स्वरूप आता बदलू लागले आहे. टॅलेंट हंट शो कमी आणि टीआरपीनुसार स्क्रिप्टेड शो म्हणून याकडे पाहिले जातात.
टॉप 15 स्पर्धकांच्या नावाची घोषणा
नुकतीच ‘इंडियन आयडॉल सीझन 13’च्या टॉप 15 स्पर्धकांच्या नावाची घोषणा सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर करण्यात आली. या यादीत ऋषी सिंह, शिवम सिंह, बिदिप्ता चक्रवर्ती, सोनाक्षी कार, नवदीप वडाली, सेंजुती दास, चिराग कोतवाल, संचारी सेनगुप्ता, काव्या लिमये, अनुष्का पात्रा, रूपम भरनार्हिया, प्रीतम रॉय, देबोस्मिता रॉय, शगुन सिंह पाठक, विनीत सिंह यांच्या नावांचा समावेश आहे.
नेमका वाद काय?
या यादीमुळेच आता सोशल मीडियावर मोठा वाद रंगलेला पाहायला मिळतोय. या यादीत रिटो रिबाचे नाव नाही, हे पाहून नेटकऱ्यांचा प्रचंड संताप झाला. यानंतर सोशल मीडियावर इंडियन आयडॉलवर बहिष्कार घालण्याची मागणी सुरू झाली आहे. अनेकांनी रिटोला या कार्यक्रमात घेण्याची मागणी केली. रिटोने ऑडिशनमध्ये गायलेले गाणे प्रेक्षकांसह चाहत्यांना देखील आवडले होते.
रिटो रिबा अरुणाचल प्रदेशातील गायक आणि संगीतकार आहे. रिटोचे स्वतःचे YouTube चॅनल आहे, ज्याचे दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. ‘इंडियन आयडॉलच्या 13’व्या सीझनमध्येही तो ऑडिशनसाठी आला होता. त्याने ऑडिशन दिले. त्यानंतर त्याने स्वतःबद्दल सांगितले, तो कोण आहे आणि तो कुठून आला आहे, तो काय करतो, याची माहिती दिली. यानंतर, हिमेश रेशमियाने त्याला स्वतः लिहिलेले गाणे ऐकावायला सांगितले. रिटोने ऑडिशनमध्ये स्वतः स्वरबद्ध केलेले गाणेही गायले. जे लोकांना खूप आवडले. इतके असूनही त्याला या शोमध्ये एन्ट्री न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत आणि ते या शोला ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी करत आहे.
हेही वाचा :
Indian Idol 13 Promo : 'इंडियन आयडॉलचा 13' लवकरच होणार सुरू; प्रोमो आऊट