Durga Marathi Serial : अवघ्या तीनच महिन्यांत संपणार 'दुर्गा'चा प्रवास, अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली,'वन लास्ट टाईम...'
Durga Marathi Serial : कलर्स मराठीवरील आणखी एक मालिका अवघ्या काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Durga Marathi Serial : कलर्स मराठीवर (Colors Marathi) सध्या अनेक नव्या मालिकांचा प्रवास सुरु होतोय. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं चित्र आहे. नुकतीच काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली 'अबीर गुलाल' (Abeer Gulal) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता कलर्सवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कलर्स मराठीवर 'पिंगा ग पोरी पिंगा' ही मालिका येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित केली जाईल. त्यामुळे 'दुर्गा' (Durga) मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.
कलर्स मराठी तीन महिन्यांपूर्वी दुर्गा ही मालिका सुरु झाली होती. या मालिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुले मुख्य भूमिकेत आहेत. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.कारण नुकतीच मालिकेत दुर्गा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रुमानी खरे हिने केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
रुमानीची पोस्ट नेमकी काय?
रुमानीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'वन लास्ट टाईम... दुर्गा... या खुर्चीवर बसून दुर्गाच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होतना मनात सगळ्या भावना एकत्र दाटून आल्या आहेत. हा प्रवास लहान होता पण बरंच काही शिकवून गेला आहे. ज्यांनी ‘दुर्गा’च्या प्रवासात मदत केली, त्या सगळ्यांच्या कल्पना, मेहनत याची मी कायम ऋणी राहीन. पुन्हा भेटूयात…'
काय आहे दुर्गाची गोष्ट?
सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेते हे मालिकेतून पाहायला मिळतंय. दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकली असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारत आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
View this post on Instagram