Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप? समोर आलं मोठं कारण
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. पण आता हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.
'या' कारणाने 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या कार्यक्रमाचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. एकीकडे टीआरपीच्या कारणाने हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झी मराठीवर एक नवा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला स्लॉट मिळत नसल्याने 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे. नवा कार्यक्रम संपल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम पुन्हा एकदा महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज होईल.
'चला हवा येऊ द्या' हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम (भालचंद्र कदम), सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम हे सर्व विनोदवीर घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमाने या सर्व विनोदवीरांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन हे विनोदवीरदेखील प्रेक्षकांना खळखळून हसवत राहिले. थुकरटवाडी या गावात घडणाऱ्या गमती जमती ते पोस्टमन या सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील.
हिंदी मनोरंजनसृष्टीलाही 'चला हवा येऊ द्या'ची भूरळ
मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं मंच फायदेशीर राहिला. 2014 साली 'लयभारी' या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमाचे अनेक पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यात 'होऊ दे व्हायरल', 'सेलिब्रिटी पॅटर्न', 'लहान तोंडी मोठा घास', अशा अनेक पर्वांचा समावेश आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची भूरळ हिंदी मनोरंजनसृष्टीलाही पडली. अनेक बॉलिवूडपटाचं प्रमोशन या मंचावर करण्यात आलं आहे.
सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते : निलेश साबळे
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने त्याबद्दल मटासोबत बोलताना डॉ. निलेश साबळे म्हणाले,"चला हवा येउ द्या' कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास आपण थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण, पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते".
संबंधित बातम्या