(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 Update : लवकरच येणार आपला 'मराठी बिग बॉस', पाचव्या सिजनबाबत मोठी अपडेट समोर
Bigg Boss Marathi Season 5 Update : कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच बिग बॉस मराठीचा पाचवा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Update : हिंदीमधील घवघवीत यशानंतर 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi Season 5) हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. आपला मराठी बिग बॉस म्हणत बिग बॉसचा आवाज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. पहिले चार सिजन या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिजनची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे तर बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये राखी सावंतनेही एन्ट्री केली होती. पण अनेक दिवसांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाच्या पाचव्या सिजनची वाट पाहत आहेत. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बिग बॉस मराठीचा चौथा सिजन हा हिंदी बिग बॉस बरोबर सुरु झाला. परिणामी मराठी बिग बॉसच्या टीआरपीवरही त्याचा परिणाम दिसून आला. पण त्यानंतर पाचव्या सीझनची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली होती. सध्या कलर्स मराठीचा कारभार चॅनल हेड म्हणून केदार शिंदे पाहत आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीची आता फार काळ प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार नसल्याचं समोर आलं आहे.
कधी सुरु होणार बिग बॉस मराठी?
कलर्स मराठीवर सध्या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीबाबत प्रेक्षकांकडूनही वारंवार विचारणा करण्यात येत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीला येऊ शकतो. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापासून बिग बॉस मराठीची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
चॅनलकडून कलाकारांशी चर्चा
दरम्यान बिग बॉसच्या पुढच्या सीझनसाठी चॅनलकडून काही कलाकारांशी बोलणं झालं आहे. तसेच काही कलाकारांशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या विजेतेपदावर मेघा धाडे हिने नाव नोंदवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सीझनचा विजेता हा शिव ठाकरे होता. तिसऱ्या सीझनचा विजेता हा विशाल निकम झाला होता. त्याचप्रमाणे चौथ्या सीझनच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव नोंदवलं होतं. त्यामुळे बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता कोण असणार हे काहीच महिन्यांत समोर येईल.