Bigg Boss Marathi : 'लायकी, भीक अन् घाणेरडी भाषा...,' बायको स्पर्धक तरीही मराठी अभिनेत्याची बिग बॉसवर खरमरीत पोस्ट
Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात बायको स्पर्धक असूनही मराठी अभिनेत्याने बिग बॉसवर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : राडे, भांडणं, घरात राहण्यासाठी संघर्ष हे सगळं मागच्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर पाहायला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) सुरुवातीपासून प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतायत. घरातील भांडणांवरही प्रेक्षकांचीही नाराजी पाहायला मिळाली. त्यातच आता एका मराठी अभिनेत्याने या कार्यक्रमावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेता सौरभ चौघुले याची पत्नी आणि अभिनेत्री योगिता चव्हाण ही देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पण घरात भांडणावेळी वापरण्यात येणारी भाषा यावर एक खरमरीत पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
सौरभची पोस्ट नेमकी काय?
सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत म्हटलं की, लायकी, भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते... खरंच ही कुटुंबासोबत बघता येणारा कार्यक्रम आहे का? असा सवालही त्याने उपस्थित केला आहे. दरम्यान सौरभची पत्नी योगिता चव्हाण ही बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. तिच्या खेळावरही सौरभ सोशल मीडियावरुन पोस्ट करत तिला पाठिंबा देत आहे.
अंकिता झाली घरातली पहिली कॅप्टन
योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर आणि निखिल या आठवड्यात कॅप्टन होणार नाही, हे 'भाऊच्या धक्क्या'वर ठरले होते. घरचा कॅप्टन ठरवण्यासाठी बिग बॉसने सदस्यांसाठी 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हा टास्क ठेवला होता. या टास्क दरम्यान मोटरमनच्या केबिनमधील सीटवर जो बसेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरवणार असतो.तिसऱ्या फेरीत बिग बॉस या टास्कमध्ये ट्वीस्ट आणत हिरवी मार्गिका बंद करतात. त्यामुळे केवळ निळ्या मार्गिकेसाठी लढत असते. हॉर्न वाजल्यानंतर वैभव आणि योगितामध्ये सीटवर बसण्यावरुन चढाओढ होते. दोघेही मोटरमनच्या सीटवर आपला दावा सांगतात. योगिता अक्षरश: रडते पण आपली जागा सोडत नाही.
योगिता ज्या एका प्रवाशाला बुलेट ट्रेनमध्ये ठेवणार त्याचे नाव कॅप्टन म्हणून जाहीर होणार असते. निक्की, वैभव, अभिजीत, अंकिता आणि पॅडी असे पाचही जण आपण कॅप्टन पदासाठी योग्य का, याची कारणे सांगतात. मात्र, योगिता ही पॅडी, निक्की, अभिजीत, वैभव यांना बाद करते आणि अंकिताला कॅप्टन म्हणून ठरवते.