Milind Gawali : "पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात 'हा' दिवस उजाडला"; 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
Milind Gawali On Ayodhya Ram Mandir : पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात 'हा' दिवस उजाडला, असं म्हणत 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट केली आहे.
Milind Gawali on Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे. नुकताच अयोध्येत भव्य-दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. देशभरात जल्लोष करण्यात आला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
मिलिंद गवळींची पोस्ट काय? (Milind Gawali Post)
मिलिंद गवळी यांनी 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"राम मंदिर उद्घाटनाचा मंगलमय दिवस होता. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान झाले. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर भारतात हिंदुस्थानात हा दिवस उजाडला. 4000 वेगवेगळ्या पंथाचे साधू संत, तीन हजाराहून अधिक vvip अतिथी, शंभरहून अधिक प्रायव्हेट जेट विमान, विमानांना एवढ्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वेगळ्या राज्यात विमान पार्क केलेली होती. सुपरस्टार्स कलाकार खेळाडू".
View this post on Instagram
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"अयोध्येमध्ये आपण पण असायलाच हवं होतं असं असं मला पण वाटत होतं , पण नंतर विचार केला की मला आमंत्रण दिलं नाही कारण माझ्या घरीच राम आहे . वडिलांचं नावच “श्रीराम” आहे. पण अयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामासारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं. मी माझं काम म्हणजेच सध्या, "आई कुठे काय करते" या मालिकेचे शूटिंग करत होतो. सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर नमस्कार गुड मॉर्निंग च्या ऐवजी "जय श्रीराम" म्हणत सगळे एकमेकांचं स्वागत करत होते. आमचे सीन्स पण किती छान होते. डॉक्टर अभी घर सोडून नोकरी करण्यासाठी कॅनडाला जातो आहे. तो परत केव्हा येईल याची शाश्वती नाही".
रामाची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे : मिलिंद गवळी
मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिलं आहे,"माझ्या डोक्यामध्ये सगळं वातावरण इतकं राममय झालं होतं, की मालिकेच्या सीनमध्ये मला वनवास भरत भेट, असंच काहीसं जाणवत होतं. डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत की इतका छान राममय वातावरण अख्या जगात झालं आहे तर, रामाची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं
मातृ-पितृ भक्ती, भावंडांवर असीम प्रेम, कर्तव्य, त्याग, कोणाही विषयी कटूता न बाळगणे, सतत प्रसन्न आणि आनंदी राहणे, सत्याचा नेहमी विजय होतो. असं काहीसं आपल्यामध्ये सुद्धा आपण आत्मसात करावं आणि पुढच्या पिढीला ही ते द्यावं. जय श्रीराम".
संबंधित बातम्या