Tarapha : 'तराफा'मध्ये अश्विनी आणि पंकज यांची केमिस्ट्री; 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज
'तराफा' या आगामी मराठी चित्रपटात अश्विनी कासार आणि पंकज खामकर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Tarapha : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी कोरी जोडी एका आगामी चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोस्टर लाँच झालेल्या 'तराफा' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अश्विनी कासार आणि पंकज खामकर ही जोडी दिसणार आहे. सहा मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं या जोडीची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी रसिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निर्माते अविनाश कुडचे यांनी भूमि प्रोडक्शन या बॅनरखाली 'तराफा'ची निर्मिती केली असून, सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'तराफा'च्या पाहिल्या पोस्टरनं या चित्रपटाबाबतचं कुतूहल वाढवण्याचं काम केलं आहे. पोस्टरवर दिसलेले कलाकार नेमके कोण आहेत आणि यात नेमकी कोणत्या कलाकारांची जोडी असेल याबाबत बरेच कयास लावले गेले, बरीच चर्चा झाली, पण खरा अंदाज कोणीही बांधू शकले नाही. आता प्रोडक्शन हाऊसनंच या रहस्यावरून पडदा उठवत दोन्ही कलाकारांच्या नावांची घोषणा केली आहे. अश्विनी कासार आणि पंकज खामकर हे दोन कलाकार 'तराफा'च्या निमित्तानं प्रथमच एकत्र आले आहेत. यापूर्वी मालिकांमध्ये काम केलं असल्यानं दोघांनाही अभिनयाचा अनुभव आहे. चित्रपटातील काम मालिकांपेक्षा थोडं वेगळं असल्यानं ती कलाही आत्मसात करत दोघांनी आपापल्या व्यक्तिरेखा सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. 'तराफा'च्या कथानकाला योग्य न्याय देण्यासाठी दोन नवीन चेहऱ्यांची गरज होती. याच कारणामुळं अश्विनी आणि पंकज यांची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचं दिग्दर्शक सुबोध पवार यांचं म्हणणं आहे. पदार्पणातच दोघांनी अप्रतिम अभिनय केला असून, दोघांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव रसिकांना चित्रपट पाहिल्यावर नक्कीच होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
अश्विनी आणि पंकज या जोडीसोबत या चित्रपटात दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे यांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच सुबोध पवार यांनी 'तराफा'ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन करत चतुरस्त्र कामगिरी बजावली आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांच्या नजरेतून 'तराफा'ची कहाणी पहायला मिळणार असून, संकलनाचं काम निलेश गावंड यांनी केलं आहे. सुबोध आणि अमृता यांनी लिहिलेल्या गीतांना विजय गटलेवार, जयश्री करंबेळकर, विवेक नाईक यांनी स्वरसाज चढवला आहे. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे, तर प्रदीप कार्लेकर आणि शार्दुल कुंवर यांनी कोरिओग्राफी केली आहे. शाऊल गटलेवार यांनी वेशभूषा, तर संतोष भोसले यांनी रंगभूषा केली आहे. केशभूषा मनाली भोसले यांची असून, कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केलं आहे. सुधीर मेश्राम या चित्रपटाचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक असून, महेश जी. भारंबे कार्यकारी निर्माते आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
