Takatak 2 : 'टकाटक 2' मध्ये दिसणार 'अशी ही बनवाबनवी' मधील 'हृदयी वसंत फुलताना' गाण्याचे नवे रूप; निर्मात्यांनी केली घोषणा
18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक 2' (Takatak 2) या सिनेमात 'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं नव्या रूपात पहायला मिळणार आहे.
Takatak 2 : मराठी सिनेमांनी इतिहास घडवत तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यापैकी काही एव्हरग्रीन संगीतप्रधान मराठी चित्रपट कायमचे रसिकांच्या मनावर कोरले गेले. यापैकीच एक आहे 'अशी ही बनवाबनवी'. या सिनेमातील गाणी आजही पॉप्युलर आहेत. कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं 'हृदयी वसंत फुलताना...' हे 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक 2'(Takatak 2) या सिनेमात 'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं नव्या रूपात पहायला मिळणार आहे. 'टकाटक 2'च्या निर्मात्यांनी नुकतीच या संदर्भातील घोषणा केली आहे.
'टकाटक'च्या रुपात मराठी तिकीटबारीवर नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल 'टकाटक २'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद कवडे यांचं आहे. अंडरकरंट एक महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या या सिनेमात 'हृदयी वसंत फुलताना...'च्या नव्या रूपाचा आनंदही लुटता येणार आहे. या गाण्यात कोणकोणते कलाकार परफॉर्म करणार, गाणं कोण गाणार, संगीत कोण देणार या सर्वच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. नवा साज घेऊन तयार करण्यात येणारं गाणं 'टकाटक २'मध्ये प्रमोशनल साँग म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंटने पॅरिस-मुख्यालय असलेल्या Believe (बीलिव्ह) डिजिटल म्युझिक कंपनीकडून 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याचे रुपांतरण आणि संक्रमण अधिकार मिळवले आहेत, ज्याने भारतातील प्रतिष्ठित संगीत रेकॉर्ड लेबलांपैकी एक आणि व्हीनस वर्ल्डवाइडचा भाग असलेल्या व्हीनस म्युझिकचे अधिग्रहण केले होते. या करारामुळे 2021 मध्ये व्हीनस म्युझिकला इश्तार म्युझिक असे नाव देण्यात आले आहे. हे गाणे इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर 6 ऑगस्टपासून संगीतरसिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
समाजात घडणाऱ्या घटनांवर विनोदी अंगाने भाष्य करताना मनोरंजक मूल्यांची सुरेख जोड देत सुमधूर संगीतरचना सादर करण्याचा फॅार्म्युला मिलिंद कवडे यांनी 'टकाटक २'मध्येही वापरला आहे. यामध्ये प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच 'टकाटक २'ची कथा-पटकथा लिहिली आहे. लेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी संवादलेखनाचं काम केलं आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी नजर खिळवून ठेवणारी असून, अभिनय जगताप यांनी दिलेलं पार्श्वसंगीत प्रसंगांमधील प्रभाव वाढवणारं आहे. निलेश गुंडाळे यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
'टकाटक 2' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 18 ऑगस्ट रोजी 'टकाटक 2' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर बातम्या: