Sunil Barve : 'तर कदाचित "सूर्याची पिल्ले" नाटकच थांबवलं असतं', अतुल परचुरेंच्या आठवणीत सुनील बर्वे भावूक
सूर्याची पिल्ले नाटक आणि अतुल परचुरेंच्या आठवणींना सुनील बर्वे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उजाळा दिला आहे.
Sunil Barve on Atul Parchure : रंगभूमीवरील हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीवरचा एक अतुलनीय तारा निखळला अशी भावना प्रत्येक कलाकाराची आणि प्रेक्षकाची आहे. अतुल परचुरे यांनी कर्करोगाशी झुंजत करत पुन्हा एकदा कमबॅक केलंही होतं. पण तरीही त्यांची ही झुंज अपयशीच ठरली. ते सुर्याची पिल्ले या नाटकातून कमबॅकही करणार होते. मात्र पहिल्या प्रयोगाच्या अगदी काही दिवस अधीच त्यांना रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं होतं.
अतुल परचुरे यांच्यानंतर सुर्याची पिल्ले या नाटकात सुनील बर्वे यांनी ती भूमिका केली. 22 सप्टेंबरला या नाटकाचा प्रयोग होता आणि 15 सप्टेंबरला अतुल परचुरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामळे अवघ्या काही दिवसांचा फरक होता आणि तोवर नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहचलं होतं. पण जर जास्त दिवस असते तर कदाचित हे नाटकच थांबवलं असं असं सुनील बर्वे यांनी अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
'तर कदाचित नाटकच थांबलं असतं..'
सुनील बर्वे यांनी म्हटलं की, अफलातूनपासून ते सूर्याची पिल्ले इथपर्यंत आम्ही सोबत होतो. आता दुर्दैवाने ती भूमिका मलाच करावी लागतेय. 22 सप्टेंबरला आमचा पहिला प्रयोग होता आणि 15 तारखेला त्याचा मला फोन आला. एक महिना व्यवस्थित तालीम सुरु होती. 15 तारखेला तो अॅडमिटच झाला आणि 14 ऑक्टोबरला तो सोडून गेला. पण जर अगदी 20 दिवस जरी असते ना तरी सूर्याची पिल्लेमध्ये ती भूमिका मी केली नसती आणि कदाचित मी नाटकच थांबवलं असतं. पण त्याच्या जाहिराती गेल्या होत्या, लोकांना सांगितलं होतं, सेट उभा राहिला होता, कलाकारांनी मेहनत घेतली होती. मग आपण प्रेक्षकांना कमिट केलं आहे तर त्यांच्यासमोर जायलाच हवं. पर्याय शोधले पण 4 ते 5 दिवसांत कुणी तयार झालं नाही. मग मला ते करावं लागलं.
'जोपर्यंत सुर्याची पिल्ले हे नाटक सुरु आहे तोपर्यंत...'
पुढे अतुलने म्हटलं की, याला काय म्हणावं हे मला माहित नाही,पण अतुलच्या मापाचे शिवलेले कपडे जे होते, माझं फोटोशूट करताना मंगल केंकरे अतुलचे ते सगळे कपडे घेऊन आली. तिने टेलरसुद्धा आणला होता. पण एका इंचाचा देखील फरक करावा लागला नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अतुलचे जसेच्या तसे कपडे आज मी प्रयोग करताना घालतोय. आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे, जोपर्यंत सुर्याची पिल्ले हे नाटक सुरु आहे तोपर्यंत अतुल माझ्यासोबत असेल कारण कपड्यांच्या कॉलवर लिहिलेलं असतं कोणाचे कपडे आहेत. अजूनही त्या कॉलवर लिहिलेलं आहे, अतुल सर. त्यामुळे तो माझ्यासोबत कायम राहिल.