Siddharth Chandekar : ते आहेत पण कुठेत हेच माहित नाही, म्हणून मी... सिद्धार्थ चांदेकर वडिलांबद्दल झाला व्यक्त
Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीमध्ये त्याच्या वडिलांविषयीच्या नात्याविषयी भाष्य केलं आहे.
Siddharth Chandekar : अभिनय क्षेत्रात काम करताना अनेक कलाकार त्यांच्या नावासोबत आईचं नाव जोडतात. त्यांची सिनेसृष्टीतली ओळखच आईच्या नावाने होते. नुकतच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याने देखील त्याच्या आईचं नाव लावण्याचमागचं कारण सांगितलं आहे. सिद्धार्थ हा त्याच्या अभिनयामुळे आणि कामामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच सिद्धार्थचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सिद्धार्थसोबत सई ताम्हणकर (Sai Tamhankar) देखील झळकली होती.
सिद्धार्थने नुकतच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलखामध्ये त्याच्या वडिलांविषयी भाष्य केलं आहे. तसेच सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी नुकतच लग्न केलं. त्यानंतर सिद्धार्थ आणि सीमा चांदेकर यांनी बऱ्याच ट्रोलिंगला देखील समोरं जावं लागलं होतं. यावर देखील सिद्धार्थने भाष्य केलं आहे. माझे वडिल आहेत, पण ते कुठेत हेच मला माहित नाही, असं म्हणत सिद्धार्थने त्याच्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लहानपणापासून वडिलांची माया असं काही माहितच नाही - सिद्धार्थ चांदेकर
लहानपणापासून वडिलांची माया किंवा वडिलधारं असं कुणी माहितच नाही, कारण तसं कोणी आजूबाजूला नव्हतंच. आपले वडिल या जगातच नसतील, तर ती एक मानसिक तयारी असते. पण मला माहितेय माझे वडील आहेत, पण ते कुठे आहेत हेच मला माहित नाही. त्यामुळे आपण तो चॅप्टर क्लोजही नाही करु शकत. हे मला लहानपणी कायम वाटायचं. पण नंतर मला ही गोष्ट कळली की, माझे वडील नाही या गोष्टीमध्ये इतका अडकलो होतो की माझी आई, माझी बहिण माझ्यासमोर 24 तास आहेत, त्यांच्याकडे मी लक्षच देत नव्हतो. त्या दोघी आहेत ना, हे माझ्या लक्षातच येत नव्हतं, असा अनुभव सिद्धार्थने शेअर केला.
ही गोष्ट सगळ्यात अवघड आहे - सिद्धार्थ चांदेकर
जेव्हा माझी पहिला मालिका आली अग्निहोत्र त्यानंतर माझ्याकडून घरात पैसे येऊ लागले. तेव्हा मला कळालं की घरात पैसे आणनं किती कठिण आहे. तुम्ही काही काम करा घरात पैसे आणनं हा सर्वात कठिण टास्क आहे. हे जसंजसं मला कळायला लागलं, तेव्हा मला वाटलं की आता त्या दोघींना आराम देऊ. इतकी वर्ष त्यांनी केलं आता माझी वेळ आलीये. त्यांनी मला कायमच स्वातंत्र्य दिलं. कोणतंही प्रेशर त्यांनी मला दिलं नाही. माझे वडिल विभक्त झाल्यानंतर जे आमचं घर विस्कटलं होतं, ते आम्ही तिघांनी मिळून पुन्हा व्यवस्थित केलं, असं सिद्धार्थनं म्हटलं.
आणि मी ठरवलं की आता हेच माझं नाव - सिद्धार्थ चांदेकर
आपल्याला ज्यांनी घडवलं त्यांचंच नाव आपण लावणं मला जास्त गरजेचं वाटतं. म्हणजे आता काही कागदपत्रांवर मी फक्त आईचं नाव नाही लावू शकत पण जिथे मला शक्य आहे, तिथे मी ते लावणार, असंही सिद्धार्थने यावेळी म्हटलं.