Sharad Ponkshe On 2008 Malegaon Case: 'हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही...'; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं
Sharad Ponkshe On 2008 Malegaon Case: 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व सातही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली, यावरच मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Ponkshe On 2008 Malegaon Case: 2008 मध्ये मालेगावमध्ये (Malegaon Blast Case) झालेल्या बॉम्बस्फोट (Bomb Blast Case) प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. निकाल देताना कोर्टानं पुरावे सबळ नसल्याचं निरीक्षण नोंदवलंय. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur), लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. यासोबतच स्फोटासाठी स्कूटर वापरल्याचं तपास यंत्रणांना सिद्ध करता आलं नाही. तसेच स्कूटर साध्वी प्रज्ञासिंहच्या नावावर होती, हे ही सिद्ध होत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. 2008 मध्ये मालेगावच्या भिक्खू चौकात रात्री 9 वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला होता. त्यामध्ये 6 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक नगरिक जखमी झाले होते. आज तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला.
एबीपी माझाच्या झिरो अवर शोमध्ये 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर चर्चा करण्यात आली. त्याला कारण होतं, तब्बल 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा लागलेला निकाल. या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी काही पाहुणे उपस्थित होते. त्यापैकी एक होते, अभिनेते शरद पोंक्षे. कार्यक्रमात बोलताना मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी शरद पोंक्षे यांनी हिंदू कधीच दहशतवादी (Hindu Terrorism) असू शकत नाही, असं सांगितलं. तसेच ते म्हणाले की, 2008 ला जाणीवपूर्वक हिंदूसुद्धा दहशतवादी असतात, हा नॅरेटिव्ह सेट झाला होता आणि त्यातून सगळे मुक्त झाले आहेत, असं शरद पोंक्षे म्हणाले.
हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह खोटा : शरद पोंक्षे
मराठी अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, "2008 पासून 2025 पर्यंत... म्हणजे जवळजवळ 17 वर्षे वाट पहावी लागली. शेवटी न्याय मिळाला. हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह खोटा होता. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. भारताचा आणि जगाचा इतिहास काढून पाहीला तर, हिंदूंनी जाऊन कुणाला तरी मारलंय, हिंदूनी विध्वंस केलाय, हिंदूंनी मशिद पाडलीय... पाडलीय म्हणजे, मूळ मशिद पाडलीय आणि मंदिर उभं केलंय किंवा चर्च उभं केलंय असं कधीही झालेलं नाही."
हिंदू कायमच सहिष्णु : शरद पोंक्षे
"इतिहातल्या राष्ट्रपुरुषांनी, सेनापतींनी आलेलं आक्रमण थोपवण्यासाठी, आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठीच हातात शस्त्र घेतली आहेत. आम्ही कधीही हिंसक नव्हतो. हिंदू कायमच सहिष्णू आहे. सगळं खोटं असल्याचं आज सिद्ध झालं आहे आणि मी खूप आनंदात आहे.", असं शरद पोंक्षे म्हणाले.
हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही: शरद पोंक्षे
पुढे ते म्हणाले की, "हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाही... इतिहासात पहिल्यांदा हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असा शब्द वापरण्यात आला. हिंदू दहशतवाद खोटा आहे; तो कधी असू शकत नाही हे नॅरेटिव्ह असत्य आहे आणि ते कोर्टात सिद्ध झालं आहे. त्यामुळे आम्ही हिंदू खुश आहोत. हिंदू या आमच्या प्राणपणानं जपलेल्या ओळखीला, ही ओळख आहे, हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाही. पण 2008 ला जाणीवपूर्वक हिंदूसुद्धा दहशतवादी असतात, हा नॅरेटिव्ह सेट झाला होता आणि त्यातून सगळे मुक्त झाले आहेत."
पाहा व्हिडीओ : Zero Hour Malegaon Blast Full EP : दहशतवाद...भगवा अन् हिरवा! सत्ताधारी विरोधक भिडले























