Saubhagyavati Sarpanch : एका स्त्रीच्या यशाची अन् प्रत्येक महिलेच्या संघर्षाची कहाणी, 'सौभाग्यवती सरपंच' सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला
Saubhagyavati Sarpanch : या प्रजासत्ताक दिनी महिला सशक्तीकरणावर आधारित नवी कोरी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Saubhagyavati Sarpanch Web Series : प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून ग्रामीण भारतातील महिला सक्षमीकरणावर भर देणारी नवी कोरी वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'सौभाग्यवती सरपंच' सीरीज 22 जानेवारीला प्रदर्शित झाली आहे. एका स्त्रीच्या यशाची आणि प्रत्येक महिलेच्या संघर्षाची कहाणी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. गावाच्या आणि समाजाच्या विकासासाठी महिला काय करु शकतात, ते यामधून दिसून येईल. महिलांनी एकदा दृढनिश्चय केला, तर त्या काय करु शकतात, ते या महिलांनी दाखवून दिले आहे. जिथे महिलांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, तिथे समाजाची खरी प्रगती होते, असा संदेश यातून मिळतो. 'सौभाग्यवती सरपंच'ही सीरीज महिला स्वातंत्र्य, शिक्षण, आणि नेतृत्व हे प्रत्येक स्त्रीचे हक्क आहेत, हे ठळकपणे दाखवते. इतकंच नाही, तर आपल्या समाजात महिलांची जागा महत्त्वाची आहे, हे देखील अधोरेखित करते.
एका स्त्रीच्या यशाची अन् प्रत्येक महिलेच्या संघर्षाची कहाणी
'सौभाग्यवती सरपंच' वेबसीरीज मध्ये ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची कहाणी दाखवण्यात आली आहे. गावातील महिलांनी समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यावर, त्यांना कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. संतोष कोल्हे दिग्दर्शित, या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले आणि अश्विनी कुलकर्णी सारखे उत्तम कलाकार पाहायला मिळतील. ही सिरीज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येईल.
'सौभाग्यवती सरपंच' देणार सामाजिक संदेश
दादाराव, गावाचा दोन टर्म सरपंच, ज्याचे जीवन केवळ राजकारणापुरते मर्यादित असते. अवली ही एक सामान्य गृहिणी, बारावीपर्यंत शिक्षण घेऊन संसाराचा रहाटगाडा हाकत असते, नवरा, मुलगा आणि सासू हेच तिचं जीवन. सरपंचपदावर निवड झाल्यावर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. महिलांच्या हाती सत्ता आल्यावर, त्यांच्या कतृत्वाची ताकद काय असते, ते अवलीने दाखवलं आहे.
महिला सशक्तीकरणावर आधारित नवी कोरी वेब सीरिज
सरपंच अवली गावातील विविध समस्या दूर करते, महिलांसाठी नवी दालने उघडते आणि संपूर्ण गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. पण, या प्रवासात तिच्या समोर अनेक अडचणी येतात, कधी घरातील अपेक्षांचा ताण, तर कधी गावातील प्रश्नांवर तोडगा शोधण्याची गरज. मात्र, तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये गावाच्या भल्यासाठीची तळमळ आणि कुटुंबाच्या आनंदासाठीचा त्याग दिसतो, जो प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच भिडणार आहे. घराची आणि सरपंचपदाची जबाबदारी पार पडत असताना ती अडचणींमधून कसा मार्ग काढते, हे केवळ महिलांनीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने बघण्यासारखे आहे.