Sagar Karande Cheated of Rs 61 Lakh: तो मी नव्हेच! ऑनलाईन ठगीनंतर सागर कारंडेची प्रकरणावर सारवासारव; पण देहबोली मात्र...
Sagar Karande Cheated of Rs 61 Lakh: सागर कारंडेनं सुरुवातीला या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. मला या प्रकरणावर बोलायचं नाही, असं स्पष्ट केलं.

Sagar Karande Cheated of Rs 61 Lakh: अभिनेता सागर करंडे (Sagar Karande) याची 61 लाखांना फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आता या प्रकरणी मुंबई सायबर क्राईममध्ये (Mumbai Cyber Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत इथे एका कार्यक्रमानिमित्त सागर कारंडे उपस्थित होता. त्यावेळी एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी सागरनं या प्रकरणावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच हे प्रकरण फेक असल्याचं सांगितलं.
सागर कारंडेनं सुरुवातीला या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. मला या प्रकरणावर बोलायचं नाही, असं स्पष्ट केलं. पण, त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सागरनं या प्रकरणावर बोलायला टाळाटाळ केली. तसेच, विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं दिली. सागर कारंडे नावाचे अनेकजण आहेत, गुगलवर तुम्ही सर्च केले, तर अनेकजण भेटतील, असं माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना सागर कारंडे म्हणाला.
सागर कारंडे मी एकटाच नाही...
मराठमोळा अभिनेता सागर कारंडे बोलताना म्हणाला की, "मला त्या प्रकरणावर बोलायचं नाही, फेक आहे ते... त्याबद्दल नाही बोलायचं मला." तसेच, याप्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे, असं विचारल्यावर सागर थोडासा वैतागूनच बोलला की, असू देत ना मग... सागर कारंडे एकच नाहीये खूप आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर खूप दिसतील तुम्हाला. जाऊ देत ना त्यांचं काम आहे, ते करतात. मरू देत ना... आपण कशाला लक्ष द्यायचं, प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काही झालेलं नाही."
प्रकरण नेमकं काय?
फेब्रुवारी 2025 मध्ये एका अनोळखी महिलेनं सागरला एक व्हॉट्सअॅप मेसेज केला. व्हॉट्सअॅपवरून सागर कारंडे आणि तिच्यात बोलणं झालं. त्यावेळी महिलेनं त्याला एक स्किम सांगितली. तिनं इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट 'लाईक' करण्याचं काम देऊ केलं आणि प्रत्येक लाईकसाठी 150 रुपये मिळतील, असं सांगितलं आहे. दिवसाला साधारण 6,000 रुपये कमावता येतील, असंही तिनं नमूद केलेलं. सागरनं तिला होकार दिला आणि तिथेच तो फसला. तब्बल 61 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानंतर सागरनं तात्काळ पोलिसांत धाव घेऊन आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली. सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.
पाहा व्हिडीओ : सागर कारंडेची 61 लाखांना फसवणूक
महत्त्वाच्या इतर बातम्या :























