Riteish Deshmukh : वेड ते रेड 2 महाराष्ट्रात आपल्या रितेश भाऊची हवा!
Raid 2 : आता ‘रेड २’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सिनेमामुळे रितेश पुन्हा एकदा चर्चेत आहे. यात त्याने साकारलेली ‘दादाभाई’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात भरली आहे.

Raid 2 Box Office : मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात, जे प्रत्येक वेळी नव्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतात. त्यांच्यातील प्रामाणिकपणा, मेहनत आणि प्रतिभा हे त्यांचे खरे ओळखचिन्ह असते. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हे त्याच पठडीतले एक नाव. बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी मराठी सिनेसृष्टीकडे वळत आपल्या भूमिकांनी, दिग्दर्शनाने आणि विनोदाने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
रितेश देशमुख यांचा ‘वेड’ (Ved)हा २०२२ साली आलेला पहिलाच मराठी दिग्दर्शित चित्रपट देशभरात प्रचंड गाजला. प्रेक्षकांनी अक्षरशः चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली आणि या सिनेमाने तब्बल ₹७५ कोटींची कमाई केली. हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. ‘वेड’ केवळ थिएटरपुरता मर्यादित राहिला नाही, तर ओटीटीवरही गाजला आणि आजही मराठी प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा पाहिलेला एक आवडता सिनेमा ठरला आहे.
रितेश फक्त अभिनेता नाही, तर एक प्रचंड आकर्षण बिंदू आहे. प्राइम टाइम टीव्हीवर ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चे सूत्रसंचालन करताना त्याने सहानुभूती, प्रखरता, आणि विनोदाचा अद्भुत समतोल साधत शोला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. त्याचे ‘भाऊचा धक्का’ हे वीकेंड सेगमेंट प्रेक्षकांच्या मनात घर करत टीआरपीच्या बाबतीतही टॉपवर पोहचले.
आता ‘रेड २’ (raid 2) या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सिनेमामुळे रितेश पुन्हा एकदा चर्चेत आहे. यात त्याने साकारलेली ‘दादाभाई’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात भरली आहे. या चित्रपटाने जगभरात यशाचे शिखर गाठले असून, विशेषतः महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ‘रेड २’मुळे रितेशने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो केवळ स्टार नाही, तर एक भावना आहे – आपला भाऊ!
पुढील काळात रितेश ‘हाऊसफुल ५’ या मोठ्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीत हास्याचा धमाका उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. यासोबतच, ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महत्त्वाकांक्षी चित्रपट दिग्दर्शित करत आहे, जो प्रत्येक मराठ्याच्या अभिमानाचा विषय ठरणार आहे.
थोडक्यात सांगायचं झालं, तर रितेश देशमुख ही फक्त एक व्यक्तिरेखा नाही, तर एक सांस्कृतिक शक्ती आहे. महाराष्ट्र त्याला फक्त पाहत नाही, तर तो एक उत्सव बनतो – कारण तो खरा आपला भाऊ आहे!























