‘क्षणभर थांबलेला सूर्य..! रितेश देशमुखची पोस्ट; ‘राजा शिवाजी’चं चित्रीकरण पूर्ण, कधी येणार ऐतिहासिक वादळ?
चित्रपटात आधुनिक व्हीएफएक्स आणि भव्य अॅक्शन दृश्यांचा वापर करण्यात आला असून, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Raja Shivaji Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट "राजा शिवाजी"चे चित्रीकरण यशस्वीरित्या संपूर्ण झाले आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज व मुंबई फिल्म कंपनी यांच्या बॅनरअंतर्गत ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य जीवनप्रवासावर आधारित आहे. हा ऐतिहासिक बहुभाषिक अॅक्शन ड्रामा 1 मे 2026 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे.
क्षणभर थांबलेला सूर्य,मावळतीचा मावळ..
आज रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक छायाचित्र शेअर करत पोस्ट केली आहे कि, ‘‘क्षणभर थांबलेला सूर्य..
मावळतीचा मावळ..
पण क्षणभरासाठीच…
उद्याच्या तेजस्वी पहाटे साठी’
100 दिवसांची मेहनत, निष्ठा, समर्पण आणि अपार जिद्द यावर अखेर पडदा पडला. असंख्य आठवणी, असंख्य अनुभव, आणि मनात कायम राहणारे क्षण. महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन घेऊन लवकरच येत आहोत !!!
View this post on Instagram
भव्य सेट्स, चित्रपटाचं पोस्ट-प्रोडक्शन सुरु
गेल्या एका वर्षभरातील 100 दिवसात राजा शिवाजी चित्रपटाचे चित्रीकरण वाई, महाबळेश्वर, सातारा, मुंबई यांसह अनेक ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले आहे. 16व्या शतकातील महाराष्ट्र दाखवण्यासाठी ऐतिहासिक किल्ल्यांचे बारकाईने संशोधन करून त्यांची पुनर्निर्मिती करण्यात आली होती तसेच भव्य सेट्स ही उभारण्यात आले होते.चित्रपटात आधुनिक व्हीएफएक्स आणि भव्य अॅक्शन दृश्यांचा वापर करण्यात आला असून, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सध्या चित्रपट पोस्ट-प्रोडक्शनच्या टप्प्यात आहे. चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले असून, सिनेमॅटोग्राफी संतोष सिवन यांनी केली आहे, ज्यांचे हे मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण आहे.
कधी होणार प्रदर्शित?
या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. याशिवाय काही खास सरप्राइजेसही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.राजा शिवाजी हा चित्रपट एका तरुण शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची कथा सांगतो आणि प्रेक्षकांना एक भव्य व भावनिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.






















