Priya Bapat : नाटकांपासून ते हिंदी सिनेमे अन् ओटीटी सगळंच गाजवलं, पण 2018 पासून प्रिया बापटला 'मराठी सिनेमा'ची ऑफरच नाही
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट हिला मागील अनेक वर्षांपासून मराठी सिनेमाची ऑफर नसल्याचा खुलासा केला आहे.
Priya Bapat : मालिका, सिनेमे, वेब सीरिज आणि नाटकं अशा सगळ्याच माध्यमांवर अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रिया बापट हे नाव सध्या अग्रस्थानी आहे. मराठी नाटकांपासून ते ओटीटीपर्यंत मागील काही वर्षांमध्ये प्रियाने तिच्या करिअरमध्ये बरेच नवे प्रयोग केले आहेत आणि ते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेत. प्रिया आता लवकरच आणखी एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या प्रिया बापट ही जर तरची गोष्ट या मराठी नाटकाची निर्मिती करत असून या नाटकात ती मुख्य भूमिकाही साकारतेय. पण असं सगळं असलं तरीही मागील अनेक वर्षांपासून प्रिया एकाही मराठी सिनेमात दिसली नाही. आम्ही दोघी हा प्रियाचा शेवटचा मराठी सिनेमा होता. प्रियाने नुकतच रितेश देशमुखसह एका हिंदी सिनेमातही काम केलंय. पण ती दीर्घकाळापासून मराठी सिनेमात दिसली नाहीये. याविषयी प्रियाने नुकतच खुलासा केलाय.
'मला 2018 नंतर एकाही मराठी सिनेमाची ऑफरच नाही'
प्रियाने नुकतीच 'सकाळ' वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये प्रियाने एक मोठा खुलासा केला आहे. प्रिया आम्हाला मराठीच्या पडद्यावर का दिसत नाही? असा प्रश्न प्रियाला विचारण्यात आला. त्यावर प्रियाने म्हटलं की, मला 2018 नंतर एकाही मराठी सिनेमाची ऑफर आलेली नाही.. एकच ऑफर आली होती, जो मी केलाय... गेल्याच्या गेल्या वर्षी मी आणि उमेशने एक सिनेमा एकत्र केलाय. जो कधी रिलीज होईल हे आता मला माहित नाही. आम्ही दोघी हा माझा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर आजपर्यंत मला एकाही मराठी सिनेमाची ऑफर आलेली नाही. त्यामुळे जर प्रेक्षकांना मला मराठी सिनेमात बघायचं असेल तर मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि लेखकांनाही वाटलं पाहिजे आणि त्यांनी मला विचारलं पाहिजे. कारण हा मुद्दा माझ्यासाठी नाही, कारण मी एकाही सिनेमाला नाही म्हटलेलंच नाहीये. माझ्याकडे सिनेमा आलाच नाहीये तर मी नाही कसं म्हणू.
पुढे तिने म्हटलं की, 'मी या गोष्टीचा खूप विचार केला. म्हणजे असं अजिबात नव्हतं की, मी हिंदीत काम केलं तर आता मला मराठीत काम करायचं नाहीये. मी आणि काय हवं करतच होते की.. मराठी नाटकही करतेय. नाटकात कामही करतेय आणि त्याची निर्मितीही करतेय. त्यामुळे माझं असं काहीच म्हणणं नाहीये, मी नाही म्हणतच नाहीये.'