Pravin Tarde : 'आता परीक्षा देवाची...,' देऊळ बंदच्या दुसरा भाग येणार, प्रवीण तरडेंनी केली मोठी घोषणा
Pravin Tarde : प्रवीण तरडे यांनी नुकतच देऊळ बंद सिनेमाच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे.
Pravin Tarde : दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्या सिनेमांची कायमच चर्चा असते. सध्या त्यांचा धर्मवीर -2 हा सिनेमा बराच चर्चेत आहे. पण त्यांचा मुळशी पॅर्टन हा सिनेमा विशेष गाजला. मुळशी पॅटर्न या सिनेमानंतर प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. त्यातच आता त्यांनी त्यांच्या देऊळ बंद (Deool Band) या सिनेमाच्याही दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
रेडीओ सिटी मराठीच्या नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे. त्यामुळे आता देऊळ बंदचाही दुसरा भाग येणार असल्याचं स्पष्ट झालंय. इतकचं नव्हे तर प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्नविषयी देखील भाष्य केलं होतं. दरम्यान देऊळ बंदच्या दुसऱ्या भागात नेमकं काय असणार याविषयी देखील प्रवीण तरडे यांनी भाष्य केलं आहे.
'देऊळ बंदच्या दुसऱ्या भागाची घोषणा'
देऊळ बंद सिनेमाच्या पहिल्या भागात अभिनेता गष्मीर महाजनी, मोहन जोशी, निवेदिता सराफ हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यामध्ये गष्मीर महाजनी हा वैज्ञानिक होता, जो स्वामींचं मंदिर बंद करतो. मोहन जोशी यांनी या सिनेमात स्वामींची भूमिका साकारली होती. दुसऱ्या भागाची घोषणा करताना प्रवीण तरडे यांनी म्हटलं की, 'धर्मवीर 2 नंतर मुळशी पॅटर्न2 आणि देऊळ बंद 2 सिनेमे येतायत. देऊळ बंद 2 मध्येही जास्त भीषण वास्तव आहे. मागच्या भागात देवाला वैज्ञानिक भेटला होता. देवाला निदान वाद घालता तरी आला होता. यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे. म्हणून सिनेमाचं नाव आहे देऊळ बंद भाग 2- आता परीक्षा देवाची.'
'कित्येकांना मुळशी पॅटर्नच झेपला नव्हता'
मुळशी पॅटर्न या सिनेमाविषयी बोलताना प्रवीण तरडेंनी म्हटलं की, मुळशी पॅर्टनचा दुसरा भागही आता लवकरच येईल. अजून दाहक सत्य, म्हणजे समजातल्या कित्येक वर्गाला मुळशी पॅटर्न हा सिनेमा झेपलाच नव्हता. त्या सगळ्यांना सिनेमात गुन्हेगारी, गुन्हेगारी वाटत होती. पण आम्ही जगाला बोंबलून सांगत होतो की, तो गुन्हेगारीचा सिनेमा नाही, शेतकऱ्याचं पोरगं गुन्हेगार का झालं याचा तो सिनेमा आहे. खरंतर त्या वर्गाला मला हा सिनेमा दाखवयचा होता, त्यांना आमचं दु:ख सांगायचं होतं. त्या वेदना आम्हाला मांडायच्या होत्या.