Marathi Movie Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर प्राजक्ता माळीची 'फुलवंती' वरचढ, राज ठाकरेंवर आधारित 'येक नंबर' सिनेमाला टाकलं मागे
Marathi Movie Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर प्राजक्ता माळीचा फुलवंती हा सिनेमा वरचढ ठरला असून येक नंबर सिनेमा या शर्यतीमध्ये मागे पडला आहे.
Marathi Movie Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मराठी सिनेमांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) 'फुलवंती' (Phulwanti) हा सिनेमा सध्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आधारित आणि तेजस्विनी पंडीत (Tajaswini Pandit) निर्मित 'येक नंबर' (Yek Number) या सिनेमाशी स्पर्धा करतोय. पण या स्पर्धेत सध्या फुलवंती हा सिनेमा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.
येक नंबर हा सिनेमा 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. तसेच फुलवंती हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन मोठे मराठी सिनेमे लागोपाठ प्रदर्शित झाले पण यामध्ये एकच सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारत असल्याचं चित्र सध्या आहे.
फुलवंतीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
फुलवंती हा सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तसेच तिच या सिनेमात फुलवंतीची भूमिका साकारतेय. सॅनसिल्कच्या अहवालानुसार, फुलवंती सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ आठ लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी मात्र या सिनेमाने भरारी घेत 36 लाख रुपयांचा गल्ला जमवला. तसेच तिसऱ्या दिवशी या सिनेमाचा कमाई 75 लाख रुपये इतकी झाली. त्यामुळे आतापर्यंत हा सिनेमा एकूण 1 कोटी 19 लाखांचा गल्ला जमवला आहे.
सिनेमाची कथा काय?
‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. ज्या भूमिकेत प्राजक्त माळी आहे. ती कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात तेही पेशवे दरबारात तिचं येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. ही भूमिका अभिनेता गष्मीर महाजनी साकारत आहे. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं.नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आधारित आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात मांडण्यात आलीये.
'येक नंबर' बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत मागे
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित येक नंबर हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाची निर्मिती तेजस्विनी पंडितने केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमा जम बसवत बॉक्स ऑफिसवर 17 लाखांची कमाई केली. पण दुसऱ्या दिवशी ही कमाई घसरली आणि केवळ 9 लाखांचा गल्ला जमवता आला. तिसऱ्या दिवशीही सिनेमाने चांगला गल्ला जमवत 16 लाखांची कमाई केली. त्यावरुन या सिनेमाने आतापर्यंत 58 लाखांचा गल्ला जमावला असल्याचा अहवाल सध्या समोर आलेला आहे.