Boyz 3 : चित्रपटातील संवादांवर आक्षेप, बेळगावात ‘बॉईज 3’च्या प्रदर्शनाला विरोध!
Boyz 3 : ‘बॉइज थ्री’ (Boyz 3) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने विरोध दर्शवला असून, त्यामुळे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही.
Boyz 3 : ‘बॉइज थ्री’ (Boyz 3) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने विरोध दर्शवला असून, त्यामुळे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही. आज अर्थात 16 सप्टेंबरला ‘बॉईज 3’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे आधीचे दोन भाग सुपरहिट ठरले होते. त्यानंतर प्रेक्षक ‘बॉईज 3’ची आतुरतेने वाट बघत होते. मात्र, या चित्रपटातील काही संवादवर आक्षेप घेतला गेल्याने बेळगावात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही.
'बॉईज' आणि 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातल्यानंतर 'बॉईज 3' (Boyz 3) काय नवीन हंगामा घेऊन येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर, आज 'बॉईज 3' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला. मात्र, यातील संवादांवर कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कन्नड भाषा, कर्नाटक पोलीस यांचा अवमान होण्यासारखे संवाद चित्रपटात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. बेळगावात प्रकाश आणि ग्लोब या चित्रपटगृहात शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, या विरोधानंतर हे प्रदर्शन रोखण्यात आले. या चित्रपटाच्या एका दृश्यात पोलीस स्थानकात आलेल्या तरुणाला पोलीस स्थानकातील अधिकारी म्हणतो, ‘नो मराठी, ओन्ली इंग्लिश, इलदिद्र कन्नड’. त्यावर तो तरुण पोलीस अधिकाऱ्याला सांगतो, ‘साहेब जर तुम्हाला तुमच्या भाषेचा माज करता येतो, तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते. मराठी भाषेचा माज बेळगावात दाखवायचा नाही, तर कुठे दाखवायचा?’, असा सवाल तो तरुण पोलीस अधिकाऱ्याला करतो.
चित्रपटातील याच संवादाला कर्नाटक रक्षण वेदिकेने आक्षेप घेतला असून, यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉइज थ्री चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
काय आहे चित्रपटाचं कथानक?
मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हजर असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील मैत्री खरंच खूप धमाल असणार आहे. तर, यातील संवादांनी तर मराठी भाषिक रसिकांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'बॉईज 3' (Boyz 3) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची गोष्ट चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पहिल्या नंतरच प्रेक्षकांना कळणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: