पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी; नागराज मंजुळेंनी जुन्या भाषणाचा व्हिडीओ केला शेअर
Nagraj Manjule : पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी; हिंदी सक्तीवरुन वाद सुरु असतानाच नागराज मंजुळेंनी शेअर केला व्हिडीओ

Nagraj Manjule : महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20200 (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत हिंदी ही तिसरी पर्यायी भाषा म्हणून रेटण्याचं काम सुरु केलं आहे. यावर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. राज्यभरात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु असतानाच आता दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओतून नागराज यांनी मराठी भाषेप्रती आपली मतं व्यक्त केली आहेत. शिवाय या व्हिडीओला 'पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,आपुल्या घरात हाल सोसते मराठी' या सुरेश भटांच्या ओळींचे कॅप्शन दिले आहे. हा नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ आहे.
View this post on Instagram
नागराज मंजुळ या व्हिडीओमध्ये म्हणतात, आपण आपल्या भाषेचा गौरव करण्याच्या निमित्ताने इथे जमलो आहोत, याचा आनंद वाटतोय. पण भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा, असं असायला नको. तिचा अभिमान रोजच बाळगायला पाहिजे. आपली भाषा आपण अभिमानाने बोलली पाहिजे. परवा पुण्यात एका कार्यक्रमात सूत्रसंचालकाने विचारलं की, तुला काय वाटतं मराठी भाषा किती दिवस टिकेल? त्यावेळी मला जरा चिंताही वाटली, हसूही आलं. भाषा किती दिवस टिकेल, असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावतोय. मोठमोठ्या दिग्गजांनी भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली. भाषा टिकेल की नाही? हा एक प्रश्न असतो. मराठीची पडझड होते, असं वाटतं राहातं.
दरम्यान, आत्तापर्यंत सरकारच्या निर्णयाविरोधात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते सयाजी शिंदे अशा दिग्गज कलाकारांनी आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या भाषेत शिकले? असा सवालही सयाजी शिंदे यांनी विचारला होता. त्यामुळे सरकार हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















