Pawankhind : ‘त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार’, बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला!
पावनखिंडीचा रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवत आहे.
Pawankhind Movie Update : एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. बाजीप्रभूंनी स्वतःच्या देहाची जणू काही तटबंदी करून घेतली होती. एक ढाल – एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजीप्रभूंचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी बाजीप्रभू हे जणू महाकाळ म्हणून उभे होते. यावेळी बाजीप्रभू यांच्यासोबत त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, कोयाजीराव बांदल, रायाजीराव बांदल आणि बांदल सेनेच्या मराठी मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेलं हे वैभव आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.
आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए.ए.फिल्म्स प्रस्तुत 'पावनखिंड'ची (Pawankhind) निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. 18 फेब्रुवारीला 'पावनखिंड' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
पावनखिंडीचा रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' या आगामी चित्रपटात पहायला मिळणार आहे.
अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे.
चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात भूमिका आहेत.
हेही वाचा :
- Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : विजय देवरकोंडासोबत जोडलं जातंय रश्मिकाचं नाव ; लग्नाबाबत नॅशनल क्रश म्हणाली...
- Devednra Fadnavis, Amruta Fadnavis : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...
- Salman Khan : सलमान एका महिन्यात कमावतो कोट्यवधी ; एकूण संपत्ती माहितीये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha