'आई तुझी खूप आठवण येतेय...' प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला आईचं जाणं काळजाला चटका लाऊन गेलं, भावनिक पोस्ट करत म्हणाला...
प्रसादने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्याची पोस्ट नेटकऱ्यांच्या काळजाला चटका लावणारी ठरत आहे.

Prasad Jawade : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता प्रसाद जवादे सध्या आयुष्यातील कठीण टप्प्यातून जातो. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचं, प्रज्ञा जवादे यांचं निधन झालं. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी कर्करोगाशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला. या दुःखानंतर पहिल्यांदाच प्रसादने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्याची पोस्ट नेटकऱ्यांच्या काळजाला चटका लावणारी ठरत आहे.
प्रसादने आईसोबतचे हसरे, जिव्हाळ्याचे क्षण एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये आई-मुलामधील प्रेम, जिव्हाळा आणि आठवणी स्पष्टपणे दिसतायत. पोस्टसोबत लिहिलेल्या शब्दांमधून प्रसादचं दुःख आणि आईविषयीचं अपार प्रेम जाणवत आहे. “डिअर मम्मी… तुझी खूप आठवण येतेय,” असे म्हणत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये प्रसादने आपल्या आईचं व्यक्तिमत्त्वही उलगडलं आहे. श्रद्धेनं जगणारी, विद्यार्थ्यांना मनापासून घडवणारी शिक्षिका, कलेवर प्रेम करणारी आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत स्वीकारणारी अशी आईची प्रतिमा त्याने शब्दांत मांडली आहे. हे शब्द वाचून चाहत्यांनाही भरून आलंय.
प्रसाद आणि त्याच्या आईचं नातं अतिशय घट्ट होतं. आई आजाराशी लढत असताना तो तिच्या पाठीशी सावलीसारखा उभा होता. गेल्या वर्षी एका पुरस्कार सोहळ्यात त्याच्या आयुष्यातील हा जिव्हाळ्याचा क्षण सगळ्यांसमोर आला होता. त्या कार्यक्रमाला त्याची आई स्वतः उपस्थित राहून लेकाचं कौतुक करताना दिसली होती. कुटुंबाने दिलेलं ते सरप्राइज आणि माय- लेकाचं नातं प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं होतं.
कर्करोगाशी झूंज अपयशी
प्रसादच्या पत्नी अमृतानेही कठीण दिवसांत प्रसादने केवळ मुलगा नाही, तर आईसाठी तो आधार होता. तर आईने स्वतः त्याचं कौतुक करत त्याला ‘आधुनिक श्रावणबाळ’ अशी उपमा दिली होती. दरम्यान, 2024 च्या दिवाळीत आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्याच काळात प्रसादची ‘पारू’ ही मालिका सुरू होती. आईची इच्छा होती की लेकाने अभिनय सुरू ठेवावा आणि टीव्हीवर झळकत राहावं. आईची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसादने वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत काम सुरू ठेवलं. आज आई नसली तरी तिच्या आठवणी, शिकवण आणि प्रेम कायम सोबत असल्याचं प्रसादच्या या भावूक पोस्टमधून स्पष्ट होत आहे.























