Manoj Jarange Patil : "संघर्षयोद्धा" चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, संतप्त मनोज जरांगे पाटलांचा इशारा म्हणाले, जाणीवपूर्वक...
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारीत असलेला "संघर्षयोद्धा" चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनपट असणारा "संघर्षयोद्धा" चित्रपट ( Sangharsh Yoddha Movie) हा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. मागील काही महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट अडवून धरला आहे. "संघर्षयोद्धा" हा चित्रपट 26 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र, रिलीजच्या काही दिवसआधीच या चित्रपटाला आपली तारीख पुढे ढकलावी लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांनीदेखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सेन्सॉर बोर्डाने काय सांगितले?
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एकाही दृष्यावर आक्षेप घेतला नसल्याची माहिती आहे. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली आचारसंहिता, मतदान आदींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार "संघर्षयोद्धा" चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
चित्रपटाच्या टीमने काय म्हटले?
हा चित्रपट गेले 4 ते 5 महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला असल्याचे चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे . आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याच दुःख होत आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट चित्रपट होणार असं चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील यांनी सांगितले आहे.
प्रेक्षक नाराज असल्याचा दावा, नवीन रिलीज डेट काय?
हा चित्रपट प्रदर्शनापासून थांबवल्यामुळे राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जात असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. हा चित्रपट आता येत्या 21 जून 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल असेही त्यांनी सांगितले. सेन्सॉर बोर्ड ने "संघर्षयोद्धा" चित्रपट प्रदर्शनासाठी थांबवल्यावर चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे , दिग्दर्शक शिवाजी दोलताडे ,मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील आणि सर्व टीमने अंतरवाली सराटी येथे ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या.
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा...
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की आपला "संघर्षयोद्धा" चित्रपट जरी सेन्सॉर बोर्ड ने थांबवला असला ,तरी 21 जून 2024 या नव्या तारखेला सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट पाहेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मी लवकरच माझ्या वेळेनुसार पत्रकार परिषद घेऊन देखील चित्रपटा विषयी बोलेल असेही त्यांनी म्हटले.