(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation Sangharshayoddha : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण, 'संघर्षयोद्धा'च्या टीमने घेतला मोठा निर्णय
Maratha Reservation Manoj Jarange : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या टीमने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. तर, दुसरीकडे जरांगे यांच्यावर आधारीत असलेल्या संघर्षयोद्धा (Sangharshayoddha) चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाच्या टीमने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांनी अन्न,पाणी घेण्यास नकार दिला आहे. जरांगे यांची प्रकृती उपोषणामुळे खालावत चालली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यात मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी बंदची हाक दिली आहे. बीड, अहमदनगर आदीसह राज्यातील काही तालुक्यांमध्ये बंद पाळण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांच्यासाठी वैद्यकीय पथक
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती वेगाने ढासळत असल्याने सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटील यांनी नकार दिला. सध्या अंतरवाली सराटी येथे वैद्यकीय तज्ज्ञांचे एक पथक हजर आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील वैद्यकीय तपासणीकडून पाहणी किंवा उपचार करुन घेण्यास तयार नाहीत.
'संघर्षयोद्धा'च्या टीमने दिला पाठिंबा
मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या संघर्षयोद्ध या चित्रपटाच्या टीमने मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'संघर्षयोद्धा'चे आज दिवसभरातील चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय निर्माते-दिग्दर्शकांनी घेतला आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चालली आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी केले आहे. तर,
राज्य सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी केली. रोहन पाटील हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
संघर्षयोद्धा' चित्रपटात 'हे' कलाकार साकारणार भूमिका
गोवर्धन दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.