Mahesh Tillekar : महेश टिळेकरांची पोस्ट चर्चेत; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, 'मराठी प्रेक्षक गेले कुठे'
Mahesh Tillekar : महेश टिळेकर (Mahesh Tillekar) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Mahesh Tillekar : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tillekar) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. वेगवेगळ्या विषयांवरील मतं हे सोशल मीडियावर पोस्टद्वारे महेश टिळेकर मांडत असतात. नुकताच एक व्हिडीओ महेश यांनी शेअर केला. या व्हिडीओमध्ये एक चित्रपटगृह दिसत आहे. व्हिडीओला महेश टिळेकर यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'मराठी प्रेक्षक गेले कुठे?' महेश टिळेकरांचा सवाल
महेश टिळेकर यांनी व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'मराठी प्रेक्षक गेले कुठे? प्रदर्शना आधी भरपूर प्रसिद्धी करून सिनेमाची हवा करण्यात आलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट मी रिलीजच्या पहिल्या दिवशीच थिएटर मध्ये जाऊन पाहिला. त्यावेळी साधारण शंभर एक प्रेक्षक होते. वाटलं आज पहिला दिवस असल्यामुळे कदाचित प्रेक्षक कमी असतील. पण चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस झाले तसे या चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि डिजिटल मीडियाने सातत्याने बातम्या मधून या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून करोडो रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमवला आहे अशी माहिती दिली. ते पाहून माझ्या ओळखीच्या ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला नव्हता त्यांना मी थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघायचा आग्रह केला. सिनेमाला गर्दी असणार म्हणून ऑनलाईन तिकीट आधी बुक करा असेही सांगितले.'
महेश टिळेकरांनी सांगितला त्यांच्या मित्रांना आलेला अनुभव
पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये महेश टिळेकर म्हणाले, 'आज माझे दोन मित्र अडव्हान्स बुकिंग न करताच अंधेरीतील मल्टिप्लेक्स मध्ये हा सिनेमा पहायला गेले.तर संपूर्ण थिएटर मध्ये ते दोन मित्रच. बाकी प्रेक्षकच नाही. त्यांनी तिथूनच मला फोन करून सांगितलं " तुम्ही तर सांगत होता गर्दी असणार आधी तिकीट बुक करा, पण इथे तर प्रेक्षकच नाही, बरं झालं ऑनलाईन तिकीट नाही बुक केलं नाहीतर जास्त पैसे गेले असते".
महेश टिळेकरांनी पोस्टमध्ये लिहिले. पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'असं त्यांचं बोलणं ऐकून मला वाटलं कदाचित ते माझी थट्टा करत असतील.' मी त्यांना तसे बोलूनही दाखवले. रोज सोशल मीडियावर ज्या सिनेमाच्या विक्रमी कलेक्शन बद्दल बातम्या येतायेत, ते खोटं कसं असेल? बरं ऑनलाईन बुकिंवर या सिनेमाला 80% पेक्षा जास्त रिस्पॉन्स असल्याचं दाखवतायेत. मग हे सगळं खोटं कसं असू शकेल?'
View this post on Instagram
सिनेमाचं दुर्दैव की प्रेक्षक जबाबदार?
'मित्राने लगेच थिएटर मध्ये प्रेक्षक किती आहे ते दाखवण्यासाठी मोबाईल वर व्हिडिओ शूट करून मला पाठवला. तो व्हिडिओ पाहून माझी खात्री पटली. सिनेमाच्या इंटरव्हल मध्ये परत फोन करून त्याने मला सांगितलं की आधी ते दोघेच होते नंतर आणखी चारजण आले. चारमधील, एक वयोवृद्ध जोडपे होते आणि दुसरे जोडपे जे आले होते ते सिनेमापेक्षा थिएटर मधील अंधाराचा व्यक्तिगत आनंद घेण्यासाठी आल्याचे दिसत होते. करोडो रुपये खर्च करून बनविण्यात आलेला आणि त्यावर करोडो रुपये पब्लिसिटी खर्च केलेल्या सिनेमाला बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक यावे हे त्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम विशेषतः कलाकारांच्या साठी किती दुःख दायक असेल. त्या सिनेमाला प्रेक्षक नाही हे त्या सिनेमाचं दुर्दैव की प्रेक्षक जबाबदार?'
हेही वाचा :