(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून महेश मांजरेकरांनी एका व्यक्तिला मारली चापट, मांजरेकर म्हणतात...
महेश मांजरेकरांनी एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार समोर आला आहे. मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तर त्या गाडीत तिघे होते. त्यापैकी दोघांनी मद्यप्राशन केल्याचं भासत होतं. पोलिसांनी बोलवलं तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन, असं महेश मांजरेकर म्हणाले.
मुंबई : गाडीला धक्का लागला म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार समोर आला आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा पाठीमागून धक्का लागल्यावर मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांकडे दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन चापट मारली असं तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील तक्रारदार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रसंग शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे - सोलापूर महामार्गावर घडला असल्याची माहिती आहे. आपल्या पुढे असलेल्या महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने आपली कार त्यांच्या कारला पाठीमागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी तू दारु पिऊन गाडी चालवतोस का असं म्हणत आपल्याला चापट मारली असं तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे.
ते अरेरावीवर उतरले, पोलिसांनी बोलावलं तर पूर्ण सहकार्य करेल - महेश मांजरेकर याबाबत महेश मांजरेकर यांच्याशी एबीपी माझानं संपर्क केला असता ते म्हणाले की, माझ्या गाडीला मागून त्यांनी धडक दिली. त्या गाडीत तिघे होते. त्यापैकी दोघांनी मद्यप्राशन केल्याचं भासत होतं. मी त्यांना उतरून या धडकेबद्दल जाब विचारला. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करायची सोडून ते अरेरावीवर आले. मला चित्रिकरणाला उशीर होत होता म्हणून मी निघालो. या धडकेत माझ्या नव्या कोऱ्या मर्सिडीजचं नुकसान झालं आहेच. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल असेल तर हरकत नाही. पोलिसांनी बोलवलं तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन, असं महेश मांजरेकर म्हणाले.